Man Wears Kurta Made Of Railway Bedsheet Video Viral : भारतील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक सेवा सुविधा दिल्या जातात. यातील एक सुविधा म्हणजे रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट वापरण्यासाठी दिले जाते. मात्र गेल्या चार वर्षांत एसी डब्यांमधून १२.७ दशलक्षाहून अधिक बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट आणि उशा गायब झाल्यात. यावरुन सर्वांना एकच प्रश्न पडतोय की, हे सर्व सामान जाते तरी कुठे?

या प्रश्नाचे उत्तर अखेर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सापडलेय. जो पाहून आता युजर्सही चकित झालेत.

नेमकं काय व्हायरल होतयं?

व्हिडिओमध्ये एक वृद्ध काका भाजीपाला खरेदी करताना दिसतायत. यावेळी त्यांच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्यांदा पाहता सर्व काही सामान्य वाटते, पण त्यांच्या कुर्ताकडे जेव्हा झूम करण्यात आले तेव्हा सर्वच चकित झाले. कारण त्यांच्या कुर्त्यावर ‘वेस्टर्न रेल्वे’ लिहिलेला पांढऱ्या आणि निळ्या पट्ट्यांचा दिसत होता. रेल्वेच्या बेडशीटशी अगदी मिळता जुळता असा त्या कुर्त्याचा कापड होता. त्यामुळे काकांचा हा कुर्ता पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरणे अवघड झाले आहे. एका युझरने कमेंट केली की, “भावा, हे रेल्वेच्या इन्वेंट्रीचा एक भाग असल्यासारखं दिसतंय.” पण हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की, हा कुर्ता खरोखरच रेल्वेच्या चादरींपासून बनलेला आहे याचा कोणताही ठोस पुरावा नाही. अशाच प्रकारच्या प्रिंटचे कपडे बाजारात सहज उपलब्ध असतात. त्यामुळे लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.

ट्रेनमधील बेडशीट, टॉवेल, उश्या चोरीला जाण्याची समस्या रेल्वेसाठी एक मोठी अडचण आहे. दरवर्षी लाखो चादरी आणि टॉवेल गायब झाल्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. रेल्वे प्रशासन प्रवाशांना त्यांचे सामान जबाबदारीने हाताळण्याचे वारंवार आवाहन करते, परंतु चादरी आणि टॉवेलची चोरी बिनदिक्कतपणे सुरूच आहे.