Road Collapse Viral Video: हिमाचल प्रदेशातील मनाली-लेह महामार्गावर घडलेली एक थरारक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डोंगराळ भागातील वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करताना निसर्ग जितका मोहक वाटतो, तितकाच तो धोकादायकही असू शकतो, याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा आला आहे.
घटनेचा व्हिडीओ पाहताना क्षणभर विश्वास बसत नाही. एक सामानाने भरलेला ट्रक निवांतपणे रस्त्यावरून जात असतो आणि अचानक ‘धप्प’ असा आवाज होताच रस्ता अक्षरशः खचतो. काही क्षणांत ट्रकचा मागचा भाग जमिनीत गडप होतो. दृश्य इतकं भयावह होतं की जणू पृथ्वीनेच तोंड उघडून ट्रकला गिळण्याचा प्रयत्न केला आहे.
निसर्गाचा कोप की निकृष्ट बांधकाम? नेमकं कारण काय?
ही घटना मनालीजवळ घडली असून, प्रत्यक्षदर्शींच्या मते ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सामान भरण्यात आले होते. डोंगराळ भागातील माती आणि खडक आधीच सैल अवस्थेत असतात, त्यात एवढ्या वजनाचा ताण आल्यामुळे रस्त्याची पकड सैल झाली आणि क्षणात रस्ता खचला.
तज्ज्ञांच्या मते, अशा भागात भूस्खलन, मातीची धूप आणि अंतर्गत पोकळी निर्माण होणे ही सामान्य बाब असते, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास असे जीवघेणे प्रसंग घडू शकतात, त्यामुळे हा प्रकार केवळ अपघात नसून, संभाव्य दुर्लक्ष किंवा कमकुवत रस्तेबांधणीचाही परिणाम असू शकतो.
मागच्या कारचालकाची सतर्कता ठरली जीवदान
या संपूर्ण घटनेत खरा ‘हीरो’ ठरला तो ट्रकच्या मागे येणारा कारचालक. रस्ता खचताना पाहताच त्याने क्षणाचाही विलंब न करता ब्रेक लावले आणि गाडी मागे घेतली. त्याची ही चपळाई आणि प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला.
जर त्याने काही सेकंद जरी उशीर केला असता, तर कारदेखील त्या खोल खड्ड्यात कोसळली असती. सोशल मीडियावर या चालकाचं जोरदार कौतुक होत आहे. “सावध राहा, सुरक्षित राहा” या वाक्याचं हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
जेसीबीच्या मदतीने बचावकार्य
अपघातानंतर परिसरात मोठी धावपळ उडाली. तत्काळ प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी जेसीबी यंत्रणा तैनात करण्यात आली. मोठ्या प्रयत्नांनंतर ट्रकला त्या खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आलं.
सध्या या रस्त्याची दुरुस्ती सुरू असून, वाहतूक काही प्रमाणात नियंत्रित करण्यात आली आहे.
पर्यटक आणि चालकांसाठी इशारा
ही घटना सर्व पर्यटक आणि वाहनचालकांसाठी गंभीर इशारा आहे. डोंगराळ भागातील रस्ते कधी आणि कसे धोका देतील याचा काहीच अंदाज नसतो, त्यामुळे अशा ठिकाणी वाहन चालवताना योग्य अंतर ठेवणं, वेगावर नियंत्रण ठेवणं आणि सतत सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ एकच गोष्ट सांगतो, निसर्गासमोर माणूस किती असहाय्य आहे आणि एका क्षणाची चूक किती मोठा अपघात घडवू शकते!
