‘अॅंजल ऑफ मँचेस्टर’ म्हणून सारं जग आज पोला रॉबिन्सनला ओळखू लागलंय. अनेक छोट्या मुलींना वाचवणारी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणारी ती देवदूतच ठरली आहे. बॉम्बस्फोटानंतर ५० हून अधिक मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी तिने मदत केली. ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान स्फोट झाला. या स्फोटात २२ हून अधिक जण ठार झाले, तर ५० हून अधिक जण जखमी झाले.

या स्फोटादरम्यान पोला आपल्या पतीसह शेजारच्या स्टेशनवर उभी होती. तिने स्फोटाचा आवाज ऐकला. काय झालं हे पाहण्यासाठी ती आणि तिच्या पतीने स्टेडिअमच्या दिशेने धाव घेतली आणि या स्टेडिअमध्ये अतिरेकी हल्ला झाल्याचे तिच्या लक्षात आले. जो तो आपले प्राण वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळत होता. यात अनेक लहान मुली देखील होत्या. काही जखमी होत्या तर काही घाबरल्या होत्या. पोलाने या मुलींना पाहिलं. या सगळ्या मुलींना धीर देत पोला त्यांना एका सुरक्षित हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून तिने आपला फोन नंबर शेअर केला. तिच्यासोबत पन्नासहून अधिक मुली होत्या. या लहान मुलींच्या पालकांशी संपर्क साधून तिने सगळ्या मुलींना त्याच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहोचवले.

मँचेस्टर हल्ल्यानंतर एका भारतीय वंशाच्या शीख चालकांनी देखील जखमींना खूप मदत होती. त्यांनी हल्ल्यातील पीडितांना मोफत सुरक्षित ठिकाणी किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले होते. या दोघांचंही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.