आजही आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत. अनेकदा रस्त्यावरून फिरताना महिलांना असे वाईट अनुभव येत असतात. अगदी दिवसा ढवळ्या सार्वजनिक ठिकाणी देखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. स्पर्श करणं, तिची छेड काढणं, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणे असे अनेक अनुभव महिलांच्या वाट्याला येतात. पण या अन्यायावर गप्प न बसता प्रत्येक महिलेने यावर आवाज उठवायला हवा. स्वत:वर होत असलेल्या अन्यायावर असाच आवाज उठवलाय मंगळुरूमध्ये राहणाऱ्या रश्मी शेट्टी या २२ वर्षांच्या तरूणीने.

महाविद्यालयात शिकणाऱ्या या तरूणींला एक इसम नेहमी त्रास देतो. ती एकटी आहे हे पाहून बाईकवरून तिचा पाठलाग करतो. अनेकदा तिने त्याला या कृतीबद्दल हटकले. पण या रोडरोमिओने काही तिचा पाठलाग करणं सोडलं नाही. त्याने तिला घाबवण्याचाही प्रयत्न केला तेव्हा रश्मीने त्याच्या गाडीचा फोटो काढून तो आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. ‘KA 19 EU 0932’ असा त्याच्या गाडीचा नंबर असून या गाडीमालकाचं कृत्य तिने जगासमोर उघड केलंय. तिने फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोत ही गाडी रिझवान अहमद या व्यक्तीची असल्याचं समजत आहे. या व्यक्तीने दिवसाढवळ्या आपला पाठलाग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती रश्मीने ‘दी इंडियन एक्सप्रेस’च्या वेबसाईटशी बोलताना दिला आहे. रश्मीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला त्रास देणाऱ्या या व्यक्तीचा आता लोक शोध घेत आहेत. जर तुमच्याही सोबत असंच काही घडत असेल तर तुम्हीही गप्प बसू नका, प्रतिकार करायला शिका असं आवाहन रश्मीने केलंय.