Marathi Youth Clashes with UP Cab Driver Video : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतात. पण, भाषेवरून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस हिंसक वळण घेत असल्याचे दिसतेय. भाषेच्या मुद्द्यावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. सध्या अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात मराठी बोलण्यावरून एका हिंदी भाषिक टॅक्सीचालकात आणि मराठी तरुणामध्ये वाद झाला, या वादाचे रुपांतर काहीवेळाने हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचले. पण, नेमकी घटना काय घडली जाणून घेऊ…

त्याचं झालं असं की, एका तरुणाने ऑनलाइन कॅब बुक केली, कॅब चालकानेही त्याची राईड रिक्वेस्ट स्वीकारली. पण, चालक कॅब घेऊन पाच मिनिटं उशिरा पोहोचला. पण, उशिरा पोहोचल्यानंतर त्याने मला जायचं नाही असं सांगण्यास सुरुवात केली. मराठी तरुणाच्या म्हणण्यानुसार, चालक त्याच्या डोळ्यांसमोरच कॅबमध्ये बसून होता, तरीही वेळेवर न येता शेवटी त्याने राईडच रद्द केली. यावर चिडून तरुणाने त्याला जाब विचारला. जर तुला जायचं नव्हतं मग राईड रिक्वेस्ट का स्वीकारलीस? ज्यावर कॅब चालकाने उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली, त्यामुळे तरुण संतापला आणि वादाला सुरुवात झाली. या वादाला काहीवेळातच मराठी विरुद्ध हिंदी असे वळण मिळाले.

संतापलेल्या तरुणाने अखेर व्हिडीओ ऑन करत कॅब चालकाला खडसावण्यास सुरुवात केली. कॅब ड्रायव्हर अमराठी होता, त्यामुळे तो सुरुवातीला हिंदीत उत्तर देत होता. तसेच तो तरुणाला मोठ्या रुबाबात उत्तर देत होता. जे करायचं ते करा, मला काही फरक पडत नाही,” अशा स्वरूपात त्याचं बोलणं होतं. यावर तरुणाने त्याला तुझी आरटीओमध्ये तक्रार करू का असं म्हटलं, ज्यावर त्या चालकानेही जा कर तक्रार असं उत्तर दिलं.

यामुळे वाद आणखी वाढला. यावेळी त्या तरुणासह काही लोकांनी मिळून चालकाला भररस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅबचालक कॅब सोडून पळून गेला.

दरम्यान, हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक आता कमेंट्स करत तीव्र संताप व्यक्त करत आहेत. काही युजर्स याला भाषेच्या नावाखाली सुरू असलेली गुंडगिरी म्हणत कठोर कारवाईची मागणी करत आहेत. तर काही भाषा हे आपल्याला जोडण्याचे माध्यम आहे, वेगळे करण्याचे नाही; पण काही लोक याला हिंसाचार आणि दबावाचे साधन बनवत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हणत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स

लोकांनी कमेंटमध्ये या घटनेवर टीका केली. एका युजरने लिहिले की, “यामागे एक मोठे षड्यंत्र आहे असे दिसते.” दुसऱ्या एका युजरने सवाल केला की, “मुंबईत काय चालले आहे?” तसेच तिसऱ्याने मागणी केली की, “या लोकांना ताबडतोब अटक करावी.”