आनंद महिंद्रा यांचे प्रत्येक ट्विट हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे कौतुक करणारे असते. आनंद महिंद्रा क्रिएटीव्ह लोकांची स्तुती तर करतातच पण त्यांना मदतही करतात. पुन्हा एकदा, आनंद महिंद्रा यांची नजर एका खास प्रतिभा असलेल्या मराठमोळ्या भारतीय उद्योजकावर गेली आहे. या तरुणाची कंपनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांपासून शूज बनवते.

२३ वर्षीय उद्योजक आशय भावे जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये होता. तेव्हा त्याला एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली जी टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करते आणि स्नीकर्स बनवते. थैले असे त्याच्या स्टार्टअपचे नाव आहे. दरवर्षी वापरल्या जाणार्‍या १०० अब्ज प्लास्टिक पिशव्यांची समस्या सोडवण्याचे त्याच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे.

आनंद महिंद्रा यांना त्याच्या स्टार्टअपबद्दल नॉर्वेचे माजी राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी पर्यावरण प्रमुख एरिक सोल्हेम यांनी केलेल्या ट्विटद्वारे कळले. या ट्विटनंतर आनंद महिंद्रा यांनी या स्टार्टअपबद्दल माहिती नसल्याची खंत व्यक्त करत या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचे सांगितले. हे ट्विट रि-ट्विट करत त्यांनी या कंपनीने बनवलेल्या शूजची जोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय त्याला त्याच्या स्टार्टअपसाठी निधीही देणार असल्याचे म्हटले आहे.

आशय भावे यांनी जुलै २०२१ मध्ये हा स्टार्टअप सुरू केला. कंपनीने ५० हजारांहून अधिक प्लास्टिक पिशव्या आणि ३५ हजार प्लास्टिक बाटल्यांमधील साहित्याचा पुनर्वापर केला आहे. २०१७ मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (BBA) चे शिक्षण घेत असताना भावे याला या व्यवसायाची कल्पना सुचली. हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनचा एक प्रोजेक्ट होता, ज्यावर त्याने काम केले. आता या तरुण उद्योजकाची कल्पना यशस्वी बिझनेस मॉडेल बनली आहे. सध्या, कंपनी बाजारात Nike आणि Puma सारख्या ब्रँडच्या तुलनेत लहान दिसत आहे, परंतु कंपनीची लवकरच युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत आपली उत्पादने विकण्याची मोठी योजना आखत आहे.

प्लॅस्टिक आणि रबरपासून बनवलेल्या शूजची ही कल्पना आशय भावे याने २०१९ मध्ये एमिटी विद्यापीठातील युरेका स्टार्टअप पिच स्पर्धेत मांडली होती. तेथील विजयाने त्याला प्रोत्साहन मिळाले. यामुळे भावे याला प्रोटोटाइपवर काम करण्यासाठी निधी मिळण्यास मदत झाली.

आशयची स्टार्टअप कंपनी कचरा व्यवस्थापन कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करते. प्लॅस्टिक पिशव्या उष्णता आणि दाबाच्या मदतीने फॅब्रिकमध्ये बदलल्या जातात, ज्यांना थॅलीटेक्स (ThaelyTex) असे म्हटले जाते. तयार झालेल्या फॅब्रिकला बुटाच्या आकारात कापले जाते. प्लास्टिकच्या बाटल्यांना एका फॅब्रिकमध्ये रिसायकल केले जाते, ज्याला rPET म्हणतात. हे अस्तर, शू लेस, पॅकेजिंग आणि इतर भागांसाठी वापरले जाते. शूजची एक जोडी तयार करण्यासाठी, १२ प्लास्टिकच्या बाटल्या आणि १० प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. ते चार प्रकारांमध्ये येतात, ज्याची किंमत ९९ डॉलर म्हणजे ७ हजार रुपये आहे.