Little Girl Mardani Khel video viral: लहान मुलांच्या जगात निरागसता असते, उत्साह असतो आणि असतो तो कल्पकतेचा भन्नाट अंदाज! सोशल मीडियावर सध्या चिमुकल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ हसवतात, तर काही त्यांच्या आत्मविश्वासामुळे लक्ष वेधून घेतात. असाच एक चिमुकलीच्या मर्दानी खेळाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं या व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावर अनोख्या अंदाजात साहसी खेळ सादर करताना दिसते. तिच्या देहबोलीतला आत्मविश्वास आणि खेळातील उत्साह लक्ष वेधून घेतो. आजूबाजूला उभे असलेले लोकही तिच्याकडे उत्सुकतेने पाहताना दिसतात. या व्हिडीओतील चिमुकलीचा अंदाज पाहून अनेकांना तिचे कौतुक करावेसे वाटेल. तिच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे व्हिडीओला एक वेगळीच रंगत आली आहे.

श्राव्या शिर्शीकरच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचीही चर्चा

या व्हिडीओमधील मुलगी ही श्राव्या शिर्शीकर आहे. (@shravya s shirshvikar) या नावाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर विविध पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. या प्रोफाइलवर मी शिवकन्या असा उल्लेखही दिसतो. चिमुकलीच्या या व्हिडीओमुळे तिच्या खेळातील आत्मविश्वासाची चर्चा होत आहे.

ही मुलगी मूळची महाडची असल्याचे दिसते. लहानपणापासूनच या मुलीला तिच्या आई-वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील साहसी खेळाचे प्रशिक्षण दिल्याचे तिच्या इन्स्टा अकाउंटवर दिसते. मात्र यामध्ये या मुलीचंही तितकंच कौतुक आहे की, ज्या वयामध्ये मुलं हट्टीपणा करतात, मोबाईलच्या आहारी जातात, खाण्या-पिण्यासाठी हट्ट करतात, त्या वयात ही मुलगी इतक्या जोमाने ताकदीने रस्त्यावर निर्भीडपणे साहसी खेळांचे सादरीकरण करत आहे.

लहान मुलांच्या निरागस हालचाली, त्यांची कल्पकता आणि आत्मविश्वास प्रेक्षकांना आकर्षित करतात. त्यामुळे अशा व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळू शकतो. यापूर्वीही लहान मुलांच्या अनोख्या खेळाचे आणि नृत्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसले आहे.