Viral Video : याच ठिकाणी झकरबर्गने केली होती ‘फेसबुक’ची निर्मिती

झकरबर्गने जागवल्या जुन्या आठवणी

मार्क झकरबर्गने पुन्हा एकदा आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हार्वर्ड विद्यापीठातलं शिक्षण अर्धवट सोडलेला, नापास विद्यार्थी असा ठपका १३ वर्षांपूर्वी डोक्यावर घेऊन तो बाहेर पडला खरा पण याच मुलानं फेसबुक ही सगळ्यात मोठी सोशल नेटवर्किंग साईट तयार केली आणि संपूर्ण जगाला एकत्र आणलं. हार्वर्ड सोडून त्याला १३ वर्षे झाली आणि तेरा वर्षांत पहिल्यांदा मार्कने आपल्या कॉलेजमधली एक खास आठवण फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली आहे.

नुकतीच मार्कने हार्वर्डमधल्या आपल्या वसतीगृहाला भेट दिली. वसतीगृहाच्या याच खोलीत बसून तो ‘फेसबुक’वर तासंन् तास काम करायचा. फेसबुक लाइव्हमार्फत मार्कने आपल्या वसतीगृहातल्या या आठवणीं नव्याने जागवल्या. ‘हार्वर्ड सोडल्यानंतर तेरा चौदा वर्षांनंतर मी वसतीगृहातल्या माझ्या खोलीत येत आहे. माझ्यासाठी ही फक्त छोटी जागा नसून, या जागेने मला खूप काही दिलं आहे. या खोलीतल्या छोट्याशा टेबलवर बसून मी २००४ मध्ये फेसबुकचं पहिलं वहिलं व्हर्जन तयार केलं होतं” असं म्हणत मार्कने आपल्या पत्नीसोबत या खोलीतल्या अनेक छोट्या मोठ्या आठवणींना उजाळा दिला आहे.

गुरूवारी मार्कला हार्वर्ड विद्यापीठातून पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मार्कने कॉलेज कॅम्पसमधले अनेक किस्से सांगितले. गेल्याच आठड्यात मार्कने हार्वर्डशी संबधित एक व्हिडिओ शेअर केला होता. पहिल्यांदा हावर्डमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती हे दाखवणारा तो व्हिडिओ होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mark zuckerberg share harvard dorm room video on facebook