Best Selling Cars July 2026: भारतातील कार बाजारात दर महिन्याला विक्रीचे नवे विक्रम नोंदवले जात असतात. काही मॉडेल्स सतत ग्राहकांची पसंती मिळवत असतात; तर काही गाड्या अचानक विक्रीत मोठी झेप घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. जुलै २०२६ मधील विक्रीच्या आकडेवारीतही अशीच एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेकांना ‘टाटा पंच’ पुन्हा अव्वल राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी एका लोकप्रिय कारने बाजी मारत सर्वाधिक विक्रीचा मान पटकावला. कोणती बरं आहे ही कार? तिची किंमत किती आहे? मायलेज किती मिळते? आणि ग्राहक पुन्हा पुन्हा तिचीच निवड का करीत आहेत? हे जाणून घेऊया…

जुलै महिन्यात कोणत्या कार ठरल्या सर्वाधिक विक्रीच्या?

जुलै २०२६ मध्ये अनेक लोकप्रिय कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. विशेष म्हणजे काही मॉडेल्सनी वार्षिक तुलनेत मोठी झेप घेतली.

दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी वॅगनआर राहिली. या मॉडेलच्या ३० हजार ३३८ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५८.६५ टक्के इतकी होती.

तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी एर्टिगा राहिली. या एमपीव्हीच्या २१ हजार ६०६ गाड्या विकल्या गेल्या. वार्षिक आधारावर विक्रीत ३०.१३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

चौथ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट राहिली. या हॅचबॅकच्या २१ हजार ५३८ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ५१.७८ टक्के होती.

‘टाटा पंच’च्या विक्रीत जवळपास दुप्पट वाढ

यावेळी टाटा पंच पाचव्या क्रमांकावर राहिली. या एसयूव्हीच्या २१ हजार ३१३ गाड्यांची विक्री झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत तब्बल ९७.६२ टक्क्यांची वाढ झाली. म्हणजेच जवळपास दुप्पट विक्रीची नोंद झाली.

त्यानंतर सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकी फ्रॉन्क्स राहिली. तिच्या १९ हजार ४७३ गाड्या विकल्या गेल्या. विक्रीत ५१.२८ टक्क्यांची वाढ झाली.

सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकी बलेनो राहिली. या कारच्या १८ हजार २४१ गाड्यांची विक्री झाली. वार्षिक तुलनेत ४५.८९ टक्क्यांची वाढ दिसून आली.

क्रेटा, नेक्सॉन व स्कॉर्पिओलाही चांगली मागणी

आठव्या क्रमांकावर ह्युदांई क्रेटा राहिली. तिच्या १८ हजार ८८ गाड्यांची विक्री झाली. विक्रीत ७.०४ टक्के वाढ झाली.

नवव्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन राहिली. या एसयूव्हीच्या १७ हजार ४७१ गाड्यांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ३६.२३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

दहाव्या क्रमांकावर महिंद्रा स्कॉर्पिओ राहिली. तिच्या १६ हजार नऊ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत १६.४५ टक्क्यांची वाढ झाली.

अखेर कोणत्या कारने पटकावला नंबर १ चा मान?

जुलै २०२६ मध्ये सर्वाधिक विक्रीचा मान मारुती सुझुकी डिझायरने पटकावला. या सेडानच्या २३ हजार ७९१ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात २० हजार ८९५ गाड्यांची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत १३.८६ टक्क्यांची वाढ झाली.

ग्राहकांमध्ये डिझायर लोकप्रिय ठरण्यामागे तिची परवडणारी किंमत, दमदार मायलेज आणि सुरक्षितता ही महत्त्वाची कारणे मानली जातात.

या कारमध्ये १.२ लिटर Z-सीरिज, ३-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८० बीएचपी शक्ती आणि ११२ एनएम टॉर्क निर्माण करते. मॅन्युअल प्रकारात २४.७९ किमी प्रति लिटर, ऑटोमॅटिक प्रकारात २५.७१ किमी प्रति लिटर, तर सीएनजी प्रकारात ३३.७३ किमी प्रति किलो इतके मायलेज मिळते.

सुरक्षिततेच्या बाबतीतही ही कार पुढे असून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत तिला ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ६.२६ लाख रुपयांपासून सुरू होऊन ९.३१ लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळेच परवडणारी किंमत, चांगले मायलेज आणि सुरक्षिततेचा समतोल साधणारी कार म्हणून डिझायरला ग्राहकांची पुन्हा एकदा मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे.