India’s Best-Selling Sedan in June 2026: भारतातील वाहनबाजारात एसयूव्हींची मागणी झपाट्याने वाढत असली तरी सेडान कारचं आकर्षण अजूनही कायम आहे. विशेषतः आरामदायी प्रवास, चांगलं मायलेज, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह ब्रँड या कारणांमुळे अनेक ग्राहक आजही सेडान कारलाच पसंती देतात.

जून २०२६ मधील विक्रीचा अहवाल समोर आला असून, सर्वाधिक विक्री झालेल्या सेडान कारची यादीही जाहीर झाली आहे. काही मॉडेल्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली, तर काही लोकप्रिय कारच्या विक्रीत घटही दिसून आली. मात्र, एका कारने पुन्हा एकदा ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत पहिलं स्थान मिळवलं.

पहिल्या क्रमांकावर कोणती सेडान कार?

जून २०२६ मध्ये मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार ठरली. या कारच्या तब्बल १७ हजार ८९९ गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री १५.६ टक्क्यांनी वाढली आहे.

उत्तम मायलेज, कमी देखभाल खर्च, कुटुंबासाठी उपयुक्त डिझाईन आणि मारुतीचं मजबूत सर्व्हिस नेटवर्क यांमुळे डिझायरला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे.

किंमत किती?

या कारची एक्स-शोरूम किंमत ६ लाख २६ हजार रुपयांपासून सुरू होते आणि नऊ लाख ३६ हजार रुपयांपर्यंत जाते.

फीचर्स काय आहेत?

नवीन डिझायरमध्ये आकर्षक एलईडी हेडलॅम्प्स, रुंद फ्रंट ग्रिल, १५ इंचांचे अलॉय व्हील्स असून, प्रीमियम लूक देण्यात आला आहे.

कारच्या आतील भागात प्रशस्त जागा, ड्युअल-टोन इंटिरिअर व ३८२ लिटरचा बूट स्पेस मिळतो. उच्च प्रकारांमध्ये ९ इंचांची टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्ले, सनरूफ, ऑटोमॅटिक एसी आणि ३६० अंश कॅमेरा यांसारखी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या बाबतीतही आघाडीवर

डिझायरला भारत NCAP ची ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. त्याशिवाय ६ एअरबॅग्स, ईएसपी (Electronic Stability Program), एबीएससह ईबीडी व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) ही सुरक्षा वैशिष्ट्ये सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन असून, ते ८० बीएचपी इतकी ताकद निर्माण करतं. पेट्रोल प्रकारात २४.७९ ते २५.७१ किमी प्रति लिटर, तर सीएनजी प्रकारात ३३.७३ किमी प्रति किलो इतका मायलेज कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.

दुसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर कोणत्या कार?

सर्वाधिक विक्री झालेल्या सेडान कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) आहे. या कारच्या पाच हजार ९७७ गाड्या विकल्या गेल्या. वर्षाच्या तुलनेत १०.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर होंडा अमेझ (Honda Amaze) असून, तिच्या दोन हजार ९३७ गाड्या विकल्या गेल्या. या कारच्या विक्रीत तब्बल २९.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

चौथ्या क्रमांकावर फोक्सवॅगन व्हर्टस (Volkswagen Virtus) आहे. या कारच्या एक हजार १९५ गाड्यांची विक्री झाली. मात्र, तिच्या विक्रीत ३२.८ टक्क्यांची घट झाली आहे.

पाचव्या क्रमांकावर स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) असून, तिच्या एक हजार ८३ गाड्यांची विक्री झाली. या कारच्या विक्रीत २०.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

इतर सेडान कारची विक्रीही जाणून घ्या

या पाच कारव्यतिरिक्त होंडा सिटीच्या ७४५, टाटा टिगोरच्या ६०२, ह्युंदाई व्हर्नाच्या ५५४, तर टोयोटा कॅम्रीच्या १९१ गाड्यांची विक्री झाली.

विशेष म्हणजे, जून २०२६ मध्ये देशभरात टॉप १० सेडान कारच्या एकूण ३१ हजार १८३ गाड्यांची विक्री झाली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे. यावरून भारतीय ग्राहक आजही चांगलं मायलेज, विश्वासार्ह ब्रँड, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षिततेचा उत्तम समतोल असलेल्या सेडान कारला प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट होतं.