ऑटो क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीला लॉकडाउनमध्ये प्रोडक्शन सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. हरयाणा सरकारने काल(दि.२२) मारुती सुझुकीला मानेसर येथील कारखान्यात प्रोडक्शन सुरू करण्याची परवानगी दिली. 4,696 इतक्या मर्यादित कामगारांसोबतच कारखाना सुरू करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. पण, परवानगी मिळाली असली तरी प्रोडक्शन सुरू करता येणार नाही असं कंपनीने म्हटलं आहे.

“सरकारने परवानगी दिली हे कंपनीसाठी भविष्यातील तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून चांगले आहे. पण आम्ही प्रोडक्शन सुरू करु शकत नाही. जोपर्यंत कंपनीच्या सर्व वेंडर कंपन्यांना उत्पादनाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत गाड्यांचं उत्पादन सुरू करता येणार नाही”, असे Maruti Suzuki चे चेअरमन आर. सी. भार्गव ‘द हिंदू’शी बोलताना म्हणाले.

“कारचं उत्पादन घेण्यासाठी अन्य अनेक घटकांची व साहित्याची आवश्यकता असते. त्यासाठी हजारो विक्रेत्यांना उत्पादन सुरू करावे लागेल. असं काही होण्याची सध्यातरी शक्यता नाही, कारण त्यांच्यातील अनेकजण रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला साहित्याचा सर्व संच मिळू शकत नाही. रिटेल दुकानेही अद्याप सुरू झालेली नाहीत. विक्री सुरू नसेल तर तुम्ही उत्पादन सुरू करु शकत नाही”, असे भार्गव यांनी नमूद केले.

देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजे जवळपास एक महिन्यापासून मारुती सुझुकीचं उत्पादन पूर्णपणे बंद आहे.