Viral Video: चायनीज भेळ, पिझ्झा, पास्ता, डोसा आदी पदार्थांची चव वाढवण्यासाठी किंवा पदार्थांची सजावट करण्यासाठी चीज किंवा मेयोनीजचा वापर केला जातो. त्यामुळे कोणताही चमचमीत किंवा चटपटीत पदार्थ मेयोनीज आणि चीज टाकल्याशिवाय पूर्ण होत नाही. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांच्या स्टॉलवर तुम्ही पाहिलंत तर त्यांच्याकडे मेयोनीज आणि चीजच्या बरण्या तुम्हाला दिसून येतील. पण, आज एका विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विक्रेता त्याच्या खाद्यपदार्थांमध्ये मेयोनीज वापरत नाही. तसेच तो मेयोनीज का वापरत नाही याचे कारणसुद्धा सांगताना व्हिडीओत दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ इंदोरचा आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारा विक्रेता एक प्रयोग करून दाखवतो आहे. विक्रेता गॅसवर तवा ठेवून त्यात बाटलीतलं चीज व दुसऱ्या बाटलीतलं मेयोनीज ओतून दाखवतो. जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तव्यावरील चीज वितळू लागते. पण, मेयोनीज अजिबात वितळत नाही. न वितळणारं हे मेयोनीज खाद्यपदार्थांद्वारे पोटात गेल्यास बरंच नुकसान होऊ शकतं. तर हीच गोष्ट विक्रेत्याला ग्राहकांपर्यंत पोहचवायची आहे, जे अगदीच आवडीने प्रत्येक पदार्थ मेयोनीजसह खातात. विक्रेत्याने व्हिडीओत कोण कोणत्या गोष्टी सांगितल्या, ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…सीट्सवर पाय अन् मोबाईल बॅटरी ऑन…; थिएटरमध्ये प्रेक्षकांनी असे काही केले की, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्याला ग्राहकांना जागरूक करायचे आहे, असे तो सांगतो आहे. तसेच प्रत्येकाला विश्वास बसावा म्हणून त्याने तव्यावर एक प्रयोगसुद्धा करून दाखवला आहे. तसेच विक्रेत्या तो विकणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थांत मेयोनीजचा उपयोग करत नाही आणि खास गोष्ट अशी की, विक्रेत्याने ‘हमारे यहा मेयोनीजका उपयोग नहीं किया जाता’ म्हणजेच ‘आमच्या येथे मेयोनीज वापरलं जात नाही’, असा बोर्डसुद्धा त्याच्या स्टॉलवर लावून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @indori_explorerr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काहींना विक्रेत्याने सांगितलेली गोष्ट पटत नाही आहे, तर अनेक जण मेयोनीजसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात म्हणून विक्रेता याचा उपयोग करत नाही आहे, असे म्हणताना दिसून आले आहेत. पण, काही नेटकरी मात्र या विक्रेत्याचे भरभरून कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.