Mcdonalds Shravan Special Burger Faces Backlash : प्रत्येक व्यावसायिक त्याची वस्तू विकली जावी यासाठी वेगवेगळ्या शकला लढवत असतो, जाहिराती करत असतो. मॅकडॉनल्डसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या एकापेक्षा एक जाहिराती बनवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. परंतु, अनेक परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातही प्रामुख्याने संपन्न भारतीय खाद्यसंस्कृतीसमोर आंतरराष्ट्रीय हॉटेल कंपन्यांना वेगळे प्रयोग करायला लावले. बहुसंख्य हिंदू व जैन धर्मीय लोक श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत. तसेच या महिन्यात खाण्या-पिण्याचे काही विशिष्ट नियम पाळतात. अशातच या मोठ्या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी मॅकडॉनल्डने त्यांच्या मेन्यूमध्ये (पदार्थांची यादी) बदल केला आहे. मात्र कंपनीला याचा फायदा होण्याऐवजी मॅकडॉनल्डला टीकेचा सामना करावा लागत आहे.

मॅकडॉनल्डने श्रावण स्पेशल मेन्यू सादर केला आहे. हा मेन्यू पाहून अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. मॅकडॉनल्डने श्रावण महिन्यात कांदा व लसूण नसलेला बर्गर सादर केला आहे. काही फूड ब्लॉगर्सनी हा मेन्यू व कांदा-लसणाचा समावेश न केलेल्या बर्गरचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी मॅकडीवर टीका केली आहे.

मॅकडॉनल्डचा श्रावण स्पेशल बर्गर

अनेकजण श्रावणात मांसाहारासह कांदा व लसूण खाणं टाळतात. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॅकडॉनल्ड इंडियाने कांदा व लसूण न घातलेला बर्गर सादर केला आहे. या बर्गरचा एक व्हिडीओ Eat.Around.The.City नवाच्या एका फूड ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या ब्लॉगरने व्हिडीओत म्हटलं आहे की “श्रावण महिन्यात तामसिक अन्नापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी मॅकडॉनल्डचा नवा बर्गर, लोक हा बर्गर निसंकोचपणे खाऊ शकतात, कारण मॅकडॉनल्डचं शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठीचं किचन वेगवेगळं असतं.”

हे ही वाचा >> ‘आप्पाचा विषय हार्ड…’ श्वानाला डबल सीट घेऊन वृद्ध व्यक्तीचा स्वॅग; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आप्पा सापडले…”

लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

एका युजरने या व्हिडीओवर कमेंट केली आहे की “जिथे मांसाहारी व शाकाहारी अशा दोन्ही प्रकारचं जेवण बनवलं जातं तिथं कसला श्रावण स्पेशल मेन्यू?” दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की “उगाच मॅकडॉनल्डचा प्रचार करू नका. ती वाईट कंपनी आहे, त्यांच्या पदार्थांमुळे लोक आजारी पडतात”. आणखी एका युजरने म्हटलंय, “मॅकडॉनल्ड लवकरच उपवास करणाऱ्या लोकांसाठी साबूदाना बर्गर विकण्यास सुरुवात करेल.” काही युजर्सने म्हटलंय, “मुळात श्रावण महिन्यात हे सगळं खायची काय गरज? त्याऐवजी घरी शिजवलेलं शुद्ध आणि साधं भोजन करावं.”