जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी नवग्रह मंदिराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शिवलिंगाला अभिषेक केला. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर आता नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आता भारतात अच्छे दिन आले वाटतं असं म्हटलं आहे. तर काहींनी टीकाही केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी ही सगळी नौटंकी केली आहे अशी टीका भाजपाने केली आहे. मात्र यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यावर ही माझी वैयक्तिक बाब आहे यावर चर्चा व्हायला नको या आशयाचं वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. काय आहे या व्हायरल व्हिडीओत? व्हायरल व्हिडीओत असं दिसतं आहे की जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नवग्रह मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या शिवलिंगावर जलाभिषेक केला. तसंच हात जोडून मनोभावे पूजाही केली. हा व्हिडीओ ANI या वृत्तवाहिनीने ट्विट केला आहे. तसंच हा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.. नेटकरी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पूँछ या ठिकाणी असलेल्या नवग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी शिवलिंगाला त्यांनी जलाभिषेक केला. तसंच शिवलिंगासमोर त्या नतमस्तकही झाल्या. मेहबुबा मुफ्ती यांच्या या कृतीवर मुस्लीम धर्मगुरू आणि भाजपा अशा दोहोंनी टीका केली आहे. त्यांच्यावर टीका होऊ लागताच कुणीही मला माझा धर्म शिकवू नये मला माझा धर्म ठाऊक आहे असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसंच हा सर्वस्वी माझा वैयक्तिक विषय आहे त्यावरून वाद घालण्याची आवश्यकता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपाची मेहबुबा मुफ्तींवर टीका मेहबुबा मुफ्तींवर भाजपाने कडाडून टीका केली आहे. जम्मू काश्मीरचे भाजपा प्रवक्ते रणबीर सिंह पठानिया यांनी म्हटलं आहे की ही सगळी मेहबुबा मुफ्तींची राजकीय नौटंकी आहे. याचा काहीही परिणाम इथल्या जनतेवर होणार नाही. अशा प्रकारची नाटकं करून विकास झाला असता तर जम्मू काश्मीर हे राज्य समृद्ध झालं असतं. मात्र त्यांच्या या कृतीमुळे फारसा फरक पडणार नाही असंही पठानिया यांनी म्हटलं आहे.