ऑस्ट्रेलियातील ३६ वर्षाची ज्यूलिया मोनॅको.गुरुवारी बार्सिलोनामध्ये खरेदीत व्यस्त होती. याच दरम्यान बार्सिलोनात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ज्यूलिया जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागली.या हल्ल्यातून ज्यूलिया वाचली खरी पण ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लंडन, पॅरिस आणि बार्सिलोना अशा तीन दहशतवाद्यांमधून ज्यूलिया बचावली असून मी या हल्ल्यांना घाबरणार नाही असे तिने म्हटले आहे. ज्यूलिया मोनॅको ही गुरुवारी संध्याकाळी बार्सिलोनामध्ये लास राम्ब्लास येथे खरेदी करत होती. ज्यूलिया खरेदीत व्यस्त असताना दहशतवाद्याने पादचारी मार्गावर वेगाने वाहन नेत अनेकांना उडवले. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यातून ज्यूलिया बचावली. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यूलिया पॅरिस आणि लंडनमधील दहशतवादी हल्ल्यातूनही बचावली होती. यापूर्वी ३ जून रोजी लंडनमध्ये दहशतवाद्यांच्या चाकू हल्ल्यातूनही ती बचावली होती. लंडनमध्ये हल्ला झाला त्या घटनास्थळापासून ज्यूलिया जवळच होती. तर काही दिवसांनी पॅरिसमधील नोथ्रे डेम कॅथेड्रल दहशतवाद्याने पोलिसांवर हातोड्याने हल्ला केला होता. या हल्ल्याच्यावेळीदेखील ज्यूलिया तिथेच उपस्थित होती. या तीन हल्ल्याचा अनुभव घेतल्यानंतरही ज्यूलिया घाबरलेली नाही. 'मी दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. मी यूरोपमधून घरी परतणार नाही' असे तिने सांगितले. दरम्यान, शुक्रवारी स्पेनमधील पोलिसांनी चकमकीत पाच जणांना कंठस्नान घातले. बॉम्ब बेल्ट बाळगणाऱ्या पाच जणांचा चकमकीत खात्मा झाला. या पाच जणांचा बार्सिलोना हल्ल्याशी संबंध होता अशी माहिती पोलिसांनी दिली.