Mia Khalifa emotional video Lebanon war: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष अद्याप सुरुच असून, इस्रायल लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले करत आहे. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो नागरिक जखमी झाले आहेत. या संघर्षावर लेबनीज-अमेरिकन मिया खलिफाने तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. बुधवारी इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्यांनंतर मिया खलिफाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“माझ्या देशावर हल्ल्यांसाठी माझ्याच टॅक्सचा पैसा वापरला जातोय”

मिया खलिफाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रडतान दिसत आहे. “मी भरलेल्या कराचा (टॅक्स) उपयोग माझ्याच देशावर हल्ले, बॉम्ब फेकण्यासाठी केला जात आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.” अमेरिकेत राहणाऱ्या मिया खलिफाने जागतिक महासत्ता म्हणून घेणाऱ्या देशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संघर्षाचे मिया खलिफाने ‘विनाशकारी’ असे वर्णन केले आहे.

नागरी वस्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध

मिया खलिफाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती अत्यंत अस्वस्थ दिसत आहे. लेबनॉनमधील निवासी इमारती, शाळा आणि रुग्णालये यांना लक्ष्य केले जात असल्याच्या वृत्ताचा उल्लेख करत तिने या हिंसाचाराचा निषेध केला. “माझ्या देशातून समोर येत असलेली दृश्ये मन विषण्ण करणारी आहेत,” असे ती म्हणाली. मियाच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये मोठी जीवितहानी

इस्रायलने इराण समर्थित हेझबोल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पण, शेकडो हवाई हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. लेबनॉनच्या नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १,१०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, नुकतेच नेतान्याहू यांनी या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी लेबनॉनबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे इराणपाठोपाठ आता लेबनॉनच्या संघर्षावरही तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.