mid-ceremony man cancels wedding after receiving a call during pheras : राजस्थानच्या करौली येथे शनिवारी एका लग्नात विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे नवरदेवाने लग्नाचे विधी सुरू असताना मध्येच अचानक लग्न मोडले. यामुळे एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाची बाबा म्हणजे एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाणे अगदी अखेरच्या क्षणी नवरदेवाला कोणाचा तरी फोन आला आणि त्याबरोबरच त्याने लग्नाचे पुढील विधी पूर्ण करण्यास नकार दिला.
लग्नाचे विधी थांबवण्यात आले तेव्हा वर आणि वधू हे सातपैकी सहावी फेरा घेत होते, तेव्हा अचानक नवरदेवाला फोन आला आणि त्याने तो उचलला. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाला एका मुलीने फेन केला होता असे सांगितले जात आहे. ज्यानंतर त्याने लग्नाचे उर्वरित विधी पूर्ण करण्यास नकार दिला.
नवरदेवाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे वधूच्या कुटुंबात संतापाची लाट उलसळी, त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत नवरदेव, त्याचे वडील आणि अनेक नातेवाईकांना काही काळासाठी ओलीस ठेवले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
नादोती पोलिसांनी सांगितले की दोन्ही कुटुंबांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थानिक पंचायतीच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबियांमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, वधूच्या कुटुंबाने लग्नासाठी सुमारे ५६ लाख रुपये खर्च केले होते. पंचायत आता नवरदेवाच्या कुटुंबियांनी ही रक्कम परत करावी की नाही यावर निर्णय घेणार आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथे देखील वर आणि वधू यांच्या कुटुंबात वाद झाल्याने वधूने लग्न रद्द केले होते. नवरदेवाच्या बरोबर असलेल्या काही तरूणांनी वधू पक्षातील मुलींबद्दल अश्लिल टिप्पणी केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता.
शाब्दिक बाचाबाचीमुळे सुरू झालेले वादाने लवकरच हाणामारीचे रूप घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ज्यामध्ये कपडे फाटलेल्या अवस्थेतील पुरुष गोंधळात दगडफेक करताना दिसत होते.