Uttarakhand Almora police emotional story: उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यात पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे आणि संवेदनशीलतेमुळे १० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वृद्धाची त्यांच्या कुटुंबाशी अखेर भेट झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने हातात दिलेली डायरी आणि पेन वापरून वृद्धाने लिहिलेल्या अवघ्या एका शब्दाने या १० वर्षांच्या विरहाचा शेवट झाला.

अल्मोरा जिल्ह्यातील मजखाली आणि ताडीखेत परिसरात गेल्या काही वर्षांपासून एक वृद्ध व्यक्ती भटकताना दिसत होती. मजखाली पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित प्रभारी उपनिरीक्षक विनोद फर्ट्याल यांच्या निदर्शनास सदर व्यक्ती आली. त्यांनी या वृद्धाला पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या घराविषयी आणि नातेवाईकांविषयी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानसिक आजारामुळे ते काहीही स्पष्ट बोलू शकत नव्हते.

सतत पाठपुरावा केल्यानंतरही काहीही निष्पन्न न झाल्याने आणि वृद्ध व्यक्ती काहीही बोलू शकत नसल्याचे पाहून उपनिरीक्षक विनोद फर्ट्याल यांनी एक युक्ती लढवली. त्यांनी त्या वृद्धाच्या हातात एक डायरी आणि पेन दिले. त्याला जे काही आठवत आहे, ते त्यांनी लिहिण्यास सांगितले. वृद्धाने त्या डायरीत केवळ एकच शब्द लिहिला. तो म्हणजे ‘राजेपूर’

या एका शब्दाचा धागा पकडत मजखाली पोलिसांनी तातडीने उत्तरप्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील राजेपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी वृद्धाचे फोटो आणि इतर माहिती पाठवून चौकशी करण्याची विनंती केली.

४ दिवसांच्या तपासाला यश

राजेपूर पोलिसांनी शोध घेतल्यनंतर चार दिवसांनी या वृद्धाची ओळख पटली. त्यांचे नाव श्याम सिंह असून ते फरुखाबादचे रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचाही लागलीच शोध घेतला गेला. श्याम सिंह यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक तातडीने उत्तराखंडमधील मजखाली पोलीस ठाण्यात पोहोचले. तब्बल १० वर्षांनंतर वृद्ध श्याम सिंह यांनी आपल्या कुटुंबाला पाहिले आणि ते भावुक झाले.

कुटुंबाने सोडली होती आशा

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम सिंह १० वर्षांपूर्वी मानसिक आजाराशी झुंज देत होते. त्यातूनच ते अचानक एक दिवस घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी श्याम सिंह परत येण्याची आशा सोडून दिली होती.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटीझन्स उपनिरीक्षक विनोद फर्ट्याल यांच्या तत्परता आणि संवेदनशीलतेचे कौतुक करत आहेत.