Bittu Tabahi Ajnar River Cleaning Video : नद्यांमधील वाढता कचरा आणि प्रदूषण पाहून बहुतेक लोक सरकार, स्थानिक प्रशासनाने काहीतरी केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. मात्र, ‘बिट्टू तबाही’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तरुणाने स्वतःच ही जबाबदारी स्वीकारली. तो अनेक दिवसांपासून नद्या आणि सार्वजनिक ठिकाणांवर जमा झालेला प्लास्टिकचा कचरा स्वच्छ करीत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत बिट्टूने सांगितले की, त्याचे मुख्य लक्ष्य अजनार नदी स्वच्छ करण्यावर आहे, जी सध्या प्रचंड प्रदूषित झाली आहे. नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून, सर्वसामान्यांचेही कर्तव्य आहे, असे त्याचे मानणे आहे. त्याच विचाराने कोणत्याही मोठ्या संस्थेची किंवा सरकारी मदतीची वाट न पाहता, तो स्वतः मैदानात उतरला.

फक्त व्हिडीओ नाही, तर प्रत्यक्ष काम!

विशेष म्हणजे या कामासाठी तो स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करत आहे. कचरा उचलण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यापासून ते नदीपर्यंत जाणे आणि तासन् तास स्वच्छता करणे, हे सर्व तो स्वतःच्या बळावर करत आहे. नदीतून कचरा काढतानाचे त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

मात्र, सोशल मीडियावर प्रत्येक जण त्याचे कौतुक करत आहे. पण, काही युजर्सनी असा प्रश्न उपस्थित केला की, तो केवळ व्हिडीओ बनवून व्हायरल होण्यासाठी हे नाटक करत आहे का? या टीकेला उत्तर देताना बिट्टूने एक नवीन व्हिडीओ शेअर केला. यात त्याने स्पष्ट केले की, नदीची स्वच्छता करणे हे अजिबात सोपे काम नव्हते. नदीचा केवळ एक घाट स्वच्छ करण्यासाठी त्याला तीन महिन्यांहून अधिक काळ कठोर परिश्रम करावे लागले.

बिट्टूने व्हिडीओमध्ये सांगितले की, लोकांनी हे पाहावे की, त्याने फक्त व्हिडीओ बनवले नाहीत, तर जमिनीवर प्रत्यक्ष कामही केले आहे. केवळ प्रसिद्धी मिळवणे हा आपला उद्देश नाही, हे दाखविण्यासाठी त्याने या मोहिमेदरम्यान घेतलेल्या कष्टांची माहितीही लोकांना दिली.

आपल्या मोहिमेबद्दल बोलताना बिट्टूने उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका पोस्टचाही उल्लेख केला, जी या वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळे त्याच्या या उपक्रमाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. परंतु, दुसरी बाजू म्हणजे नदी साफ करताना बिट्टूच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. दूषित पाणी, प्लास्टिक आणि साचलेल्या कचऱ्यामध्ये दीर्घकाळ काम करणे सोपे नाही. तरीही सर्व धोके पत्करून तो सातत्याने नदीस्वच्छतेच्या कामात गुंतलेला आहे.