टाळेबंदीत अनेक रस्त्यांची कामे हाती घेतल्यामुळे लॉकडाउन शिथिल होताच प्रवास सुखकर होईल, अशी कल्याण-डोंबिवलीकरांची आशा होती. मात्र गेल्या अनेक आठवड्यांपासून शहराच्या चहूबाजूंनी होत असलेल्या अभूतपूर्व वाहनकोंडीमुळे या आशेवर पाणी फिरले आहे. कल्याण-मुरबाड रस्ता, कल्याण-शीळ मार्ग, दुर्गाडी पूल, पलावा चौकात होणारी कोंडी प्रवाशांना हैराण करणारी आहे. या रस्त्यांवर वाहतूककोडींचे अनेक फोटो सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो शेअर करत मनसेच्या डोंबिवली शहर अध्यक्षांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर कल्याण-शीळ मार्गावरील शीळफाटा येथील फोटो मागील काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नजर जाईल तिथपर्यंत दुचाकीस्वार वाहतूककोंडीत अडकल्याचे चित्र दिसत आहे. हा फोटो फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांवरुन व्हायरल झालाय. हा फोटो शेअर करत मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सासरच्या लोकांना मुंबईत येताना त्रास होत असल्याचा टोला अप्रत्यक्षपणे लागवाला आहे. “मुख्यमंत्री, वहिनींच्या माहेरची मंडळी (डोंबिवलीकर) कल्याण शीळ मार्गे सासरकडे (मुंबई) निघताना….” अशी कॅप्शन देत कदम यांनी कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडीचे फोटो फेसबुकवरुन शेअर केले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत कोंडी कुठे आणि कशी?

कल्याणमधून मुरबाडकडे जाणारी वाहने कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून जातात. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. सकाळच्या वेळेत मुरबाडकडे जाणाऱ्या वाहनांची शहाड ते म्हारळ परिसरात कोंडी होते. सेंच्युरी रेयॉन परिसरात रस्ते रुंद करण्यात आले असले तरी मुरबाड रस्ता, शहाड, म्हारळ, वरप, कांबा भागांतील रस्ते अरुंद आहेत. तसेच या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे सकाळ, संध्याकाळ वाहन कोंडी होते. याच रस्त्यावर उल्हासनगरमध्ये जाणारी वाहने असतात. ती वाहने कल्याणमध्ये पहाटेच भाजीपाला, घाऊक सामान खरेदीसाठी आलेली असतात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. पत्रीपूल, दुर्गाडी पूल, गंधारे पूल येथील कोंडीमुळे शहराच्या बाहेर पडणारा नोकरदार वर्ग जागोजागी कोंडीत अडकतो. ही कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालक शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करत असल्यामुळे तेथेही कोंडी वाढली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

पत्रीपूल, दुर्गाडी पूल कोंडीग्रस्त

पत्रीपूल मार्ग आणि दुर्गाडी पूल मार्ग हे सध्या वाहतूक कोंडीची जंक्शन आहेत. या दोन्ही पुलांवरून एकाच वेळी बस, खासगी वाहने, दुचाकी धावत असल्याने कोंडीत भर पडते. दुर्गाडी चौकात पडघा, मुरबाडकडून येणारी वाहने, मुंबईत, नवी मुंबई, डोंबिवलीतून येणारी वाहने अशी एकाच वेळी समोरासमोर येतात. एका रांग मोकळी करण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. तोपर्यंत तिन्ही बाजूंकडील रस्त्यावर वाहनांचा रांगा लागलेल्या असतात. बुधवारी सकाळी पत्रीपूल-गोविंदवाडी रस्ता ते दुर्गाडी पुलावर अभूतपूर्व वाहन कोंडी होती. दीड वर्षांपासून तोडून ठेवलेला पत्रीपूल, तीन वर्षांपासून रखडलेला नवीन दुर्गाडी पूल उभारण्यात प्रशासकीय यंत्रणा ढिलाई दाखवत असल्याने त्याचा फटका बसतो, अशा प्रतिक्रिया नोकरदारांकडून देण्यात येत आहेत. डोंबिवलीतून ९० फुटी रस्त्यावरून पत्रीपूलमार्गे कल्याणकडे येणारी वाहने कचोरे टेकडीजवळ अडकून पडतात. पत्रीपुलावरील वाहने सोडली जात नाहीत, तोपर्यंत या वाहनांना प्रवेश मिळत नाही. अर्धा तास ही वाहने एकाच जागी उभी राहात असल्याने अनेक वेळा रांगा ९० फुटी रस्त्यापर्यंत जातात.

पलावा चौकात कोंडी

मागील तीन ते चार वर्षांपासून पलावा चौकात वाहतूक कोंडी होत आहे. शिळफाटा कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रहिवासी दिवा-शिळ रस्त्याच्या अवलंब करायचे. पण गावातील कोंडी थांबविण्यासाठी वाहतूक विभागाने हे रस्ते इतर वाहनांसाठी बंद केले आहेत. अनेक मालवाहू वाहने तळोजा, पुण्याकडून काटई, शिळफाटा दिशेने येण्याचा प्रयत्न करतात. खोणी नाक्यावर वाहतूक पोलीस ही वाहने मुद्दाम थांबवून ठेवतात, अशा तक्रारी आहेत. तेथे पुढे वाहनांच्या रांगा लागतात.

कोंडीचे मार्ग

’ कल्याण ते शिळ रस्ता

’ मुरबाड रस्ता ते म्हारळ रस्ता

’ पत्रीपूल ते शिवाजी चौक मार्गे लाल चौकी रस्ता

’ पत्रीपूल ते गोविंदवाडी मार्गे दुर्गाडी चौक रस्ता

’ दुर्गाडी ते रांजणोली रस्ता

’ मानपाडा ते सागाव रस्ता

’ मुरबाड रस्ता ते उल्हासनगर रस्ता

’ पेंडसेनगर ते ठाकुर्ली मार्गे ९० फुटी रस्ता

’ गंधारे ते बापगाव मार्गे पडघा रस्ता

या चौकांत कोंडी

’ पलावा चौक

’ मानपाडा चौक

’ तीसगाव नाका चौक

’ दुर्गाडी चौक

’ कल्याण फाटा चौक

’ वालधुनी नाका चौक

’ प्रेम ऑटो नाका