सध्याच्या सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ अतिशय गंभीर असतात. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचेच हे व्हिडीओ असतात. नेटकरी हे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. आता अशाच एका मजेशीर घटनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झारखंडच्या रांचीतील एका दारुच्या दुकानात चक्क एक माकड शिरल्याची घटना घडली. दुकानात शिरल्यानंतर या माकडाने कथितरीत्या मद्यपान करून दुकानातच मस्तपैकी डुलकी घेतली. ही घटना ओरमांझी येथील ब्लॉक चौक परिसरात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं.
व्हिडीओत काय दिसत आहे?
एका दारुच्या दुकानात एक माकड शिरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या माकडाने मद्याच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानातील मद्याची बाटली घेतली आणि ती कथितरीत्या संपूर्ण फस्त केली. या माकडाने मद्य प्राशन केल्यानंतर दुकानातच गाढ झोप घेतली. ही घटना ओरमांझी परिसरात घडली.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. दरम्यान, या माकडाने दुकानात काही वेळ झोप घेतल्यानंतर मात्र मोठा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. नशेत धुंद असलेल्या या माकडाने दुकानातील इतर बाटल्या पाडायला सुरुवात करत मोठा धुमाकूळ घातला.
दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्या माकडाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही हे माकड दुकानातून बाहेर जाण्यास तयार नव्हतं. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्या माकडाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या माकडाने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला. यानंतर अखेर बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी त्या माकडाला सुरक्षितपणे दुकानातून बाहेर काढलं. या संपूर्ण अनपेक्षित घटनेमुळे दुकानात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. जवळपास अडीच तास हा सर्व प्रकार सुरू होता.
