Monkey Attack On Women: भारतात अनेक ठिकाणी निवासी भागात माकडांची दहशत आहे. अनेक भागात ही समस्या सामान्य आहे. माणसांमध्ये त्यांची उपस्थिती इतकी प्रचलित झाली आहे की सर्वांनाच त्यांची भीती वाटत नाही. जरी माकडांना हनुमानाचे रूप म्हणून त्यांची पूजा केली जात असेल तरी त्यांचे हल्ले धोकादायक असतात. माकडे अनेकदा वृद्धांवर किंवा लहान मुलांवर हल्ला करतात आणि माकडाच्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, कारण त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. माकडांच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकडांचा एक गट एका वृद्ध महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड इथल्या बत्रा कॉलनीचा आहे. व्हिडीओमध्ये एख वृद्ध महिला तिच्या घराबाहेर कोवळ्या उन्हात बसलेली असताना अचानक माकडांची एक टोळी तिथे आली. तीन ते चार माकडे या व्हिडीओत दिसत आहेत. एक माकड त्या महिलेच्या पाठीमागून जावून तिला चावा घेत आहे, तर दुसरं तिचे केस ओढत आहे. काही माकडं तिचे हात आणि शरीराच्या इतर भागाला चावा घेताना दिसत आहेत. ही महिला इतकी वृद्ध होती की माकडांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी तिला पळही काढता आला नाही. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि खूप प्रयत्नांनंतर त्या माकडांना तिथून हाकलून लावले.
दरम्यान, या माकडांच्या हल्ल्यात महिला जबर जखमी झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला ताबडतोब रूग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मात्र ती अजूनही खूप घाबरेलली आहे. माकडांचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.
त्यानुसार व्हिडीओमध्ये ही वृद्ध महिला घराबाहेर खुर्चीवर बसलेली दिसते. ही घटना २६ डिसेंबरची असल्याचे सीसीटीव्हीवरून समजते. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे खरोखरच भयानक आहे अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या माकडांना गोळ्याच घातल्या पाहिजेत अशा संतप्त प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.
