पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक्स करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यात, त्यानंतर एक दिवस बुधवारी बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले. आज गुरुवारी बँका सुरू करण्यात आल्यात. आधीच संभ्रम त्यातून सुट्या पैश्यांचा तुटवडा, एटीएमही बंद अशा वेळी करणार काय त्यामुळे गुरूवारी बँका उघडताच अनेकांनी बँकेच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे काहींनी तर बँका उघडण्याआधीच बँकेबाहेर रांग लावल्या होत्या, त्यामुळे देशभरातील अनेक बँकांच्या बाहेर लांबलचक रांग पाहायला मिळाल्या. सकाळी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी जो काही कल्लोळ माजवला त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘आमची मुंबई ‘ या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ टाकण्यात आला. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तर हजारोंनी तो शेअर देखील केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बँकेच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी आणि पैसे डिपॉझिट करण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच रांग लावली होती. जसे बँकेने शटर उघडले तसे लोक धावत बँकेत आले. अनेकांनी धक्का बुक्की देखील केली. हा व्हिडिओ कोणत्या बँकेतला हा हे समजू शकले नाही. बँकेत माजलेला या कल्लोळाच्या व्हिडिओला पसंती तर मिळत आहे पण नोटा बदलण्याची अंतिम तारिख ही ३१ डिसेंबर पर्यंत आहे त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे गर्दी किंवा धक्काबुक्की करण्याची गरज नसल्याचे आवाहनही केले जात आहे.