Mother Bird Viral Video: आई ही आईच असते, मग ती माणसांची असो किंवा एखाद्या पक्ष्याची. आपल्या लेकरांच्या संरक्षणासाठी ती कोणत्याही संकटासमोर न डगमगता उभी राहते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने याच गोष्टीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले असून, आईच्या मायेपुढे जगातील कोणतीही ताकद छोटी वाटू लागली आहे.

व्हायरल झालेल्या या हृदयस्पर्शी व्हिडीओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करताना दिसतो. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक असा प्रसंग घडतो, ज्याने लाखो लोकांच्या मनाला हात घातला आहे.

शेताच्या मध्यभागी एका पक्षिणीने आपली दोन अंडी दिलेली असतात. नांगरणी सुरू असल्याने ट्रॅक्टर हळूहळू त्या अंड्यांच्या दिशेने पुढे सरकत असतो. काही क्षणांतच अंड्यांवर संकट कोसळणार, असे वाटत असतानाच अचानक ती पक्षीण भरधाव येते आणि थेट ट्रॅक्टरसमोर उभी राहते.

विशेष म्हणजे ट्रॅक्टरचा आकार तिच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. तरीही ती घाबरत नाही. उलट आपल्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी ती अक्षरशः खडकासारखी ठामपणे उभी राहते. तिच्या डोळ्यांतील काळजी आणि आपल्या पिल्लांबद्दलची माया पाहून कोणाच्याही मनात भावनांचा पूर येईल.

हा प्रसंग काही क्षणांचाच असला तरी त्यामागील संदेश अत्यंत मोठा आहे. आपल्या लेकरांसाठी आई कोणत्याही संकटाशी दोन हात करू शकते, याचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे. पक्षी असो किंवा माणूस, मातृत्वाची भावना सर्वत्र सारखीच असते, हे या व्हिडीओने दाखवून दिले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी या दृश्याला ‘मायेचा महासागर’, असे संबोधले आहे. काही जणांनी ‘आईची माया जगातील सर्वांत मोठी ताकद आहे’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आपणही भावूक झाल्याचे सांगितले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा घटना माणसाला थांबून विचार करायला भाग पाडतात. प्रेम, माया व त्याग यांची खरी व्याख्या काय असते, याची जाणीव करून देतात. एका छोट्याशा पक्षिणीने आपल्या अंड्यांसाठी दाखवलेले धैर्य आणि माया पाहून प्रत्येकाच्या मनात आईबद्दलचा आदर आणखी वाढल्याशिवाय राहत नाही.

हा व्हिडीओ पाहताना एकच गोष्ट मनात येते संकट कितीही मोठे असले तरी आई आपल्या लेकरांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहते.

येथे पाहा व्हिडीओ