Mother Elephant Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात, काही आश्चर्यचकित करतात, तर काही मनाच्या अगदी आतपर्यंत जाऊन भिडतात. सध्या इंटरनेटवर असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. एका हत्तीणीचा आपल्या मृत पिल्लासाठी सुरू असलेला संघर्ष पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. हा व्हिडीओ केवळ एक घटना नाही, तर आईच्या मायेची आणि निसर्गातील वेदनेची जाणीव करून देणारा क्षण ठरत आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मोठमोठ्या इमारती, रस्ते आणि मानवी विस्तार यामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. परिणामी अनेक प्राण्यांना अन्न, पाणी आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत आहे. काही वेळा तर साध्या सोयीसुविधांच्या अभावामुळे त्यांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत.
अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यातील धर्मजयगड वनविभाग परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्तींचा एक कळप अमामुडा तलावात आंघोळीसाठी आला होता. परिसर शांत होता. पाण्यात खेळणाऱ्या हत्तींच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, काही क्षणांतच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं.
कळपातील एक चिमुकलं हत्तीचं पिल्लू अचानक तलावातील दलदलीत अडकतं. सुरुवातीला ते स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. चिखलातून बाहेर पडण्यासाठी ते धडपड करत राहतं. त्याची आई आणि इतर हत्तीही अस्वस्थ होतात. संपूर्ण परिसरात हत्तींच्या ओरडण्याचे आवाज घुमू लागतात. मदतीसाठी जणू ते आक्रोश करत होते.
सांगितलं जात आहे की, रात्रभर हत्तींचा कळप त्या पिल्लाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, दलदल इतकी खोल होती की चिमुकलं पिल्लू त्यातून बाहेर पडू शकलं नाही. अखेर दीर्घ संघर्षानंतर त्या निष्पाप जीवाचा मृत्यू झाला.
मात्र, या घटनेतील सर्वात भावूक करणारा भाग म्हणजे त्या पिल्लाच्या आईची अवस्था. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हत्तीण आपल्या पिल्लाला सोंडेने बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसते. पिल्लाची हालचाल थांबलेली असतानाही ती त्याला सोडून जाण्यास तयार नसते. कधी ती त्याच्या भोवती फिरते, तर कधी त्याला ढकलून उठवण्याचा प्रयत्न करते. आपल्या बाळाला काही झालंय हे स्वीकारणं जणू तिच्यासाठी अशक्य झालं होतं.
हा व्हिडीओ पाहताना अनेकांना स्वतःच्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आई मग माणसांची असो किंवा प्राण्यांची… तिची माया, काळजी आणि लेकरासाठीची तगमग कधीच बदलत नाही, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
विशेष म्हणजे, गेल्या १७ दिवसांत या परिसरात हत्तीच्या तिसऱ्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यातील बहुतांश मृत्यू हे पाण्यात बुडून किंवा दलदलीत अडकून झाले आहेत, त्यामुळे वन विभागाने या गंभीर घटनांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक जण भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कुणी ‘आईची माया कधीच संपत नाही’ असं म्हणत आहे, तर कुणी वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे, जंगलात राहणाऱ्या या मुक्या जीवांचं दुःख अखेर समजून घेणार तरी कोण?
