आई कितीही कडक वाटत असली तरी तिच्या मनात फक्त आपल्या बाळाचंच भलं असतं. ती रागावते, ओरडते, हट्ट करते कारण तिला माहीत असतं की आज दिलेली शिस्त उद्या मुलाचं आयुष्य घडवणार आहे. त्या क्षणी मुलाला तिचा कडकपणा जड वाटतो, पण पुढे जाऊन तीच शिस्त आठवून समजतं की आईची प्रत्येक वागणूक प्रेमापासूनच होती.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो हेच सांगतो. या व्हिडीओत एक आई आपल्या मुलाला शाळेकडे ओढत नेताना दिसते. मुलाला शाळेत जायचं नसतं, पण आई मात्र हट्टाने त्याला घेऊन जाते. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसूही येतं आणि आपल्या लहानपणीच्या आठवणीही जाग्या होतात. कधी शाळा नकोशी वाटणं, रडणं, पळून जायची इच्छा आणि तरीही आई जबरदस्ती शाळेत पाठवायची हे सगळं पुन्हा आठवतंय.
हा व्हिडीओ एका आई आणि तिच्या लहान मुलाचा आहे. मुलाला शाळेत जायचंच नाहीये, पण आई ठाम आहे की आज शाळेत जायचंच. या दोघांच्या हट्टातून तयार झालेला हा प्रसंग पाहायला मजेशीर आहे, पण तितकाच मनाला भिडणारासुद्धा आहे, त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओत दिसतं की, मुलगा शाळेत जाण्यास नाही म्हणत आहे. तो कधी रस्त्यावर झोपतो, कधी आईचे पाय धरून रडतो; पण आई हार मानत नाही. ती कधी त्याला समजावते, कधी ओढत घेऊन जाते आणि शेवटी त्याला उचलूनच शाळेकडे निघते. तिच्या चेहऱ्यावर राग नाही, तर मुलाच्या भविष्याची काळजी असते. आज मुलाला वाईट वाटत असलं तरी उद्या त्याचं आयुष्य चांगलं व्हावं, हीच आशा आईची असते.
हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली. अनेकांनी लिहिलं, “ही तर आमची आई आहे!”, “आम्हालाही असंच शाळेत पाठवायचे.” एका युजरने तर गमतीत लिहिलं आहे, “माझ्या मागे तर शाळेतून चार मुलं पाठवायचे. ते मला उचलून नेत आणि मागून आजी काठी घेऊन यायची असे!” काही लोकांना हा व्हिडीओ खूप मजेशीर वाटला, तर काहींनी आईच्या जिद्दीचं आणि त्यागाचं कौतुक केलं. “आज आईची कडक शिस्त कळते,” असंही अनेकांनी म्हटलं आहे.

