जगातली सगळ्यात उंच म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट म्हटलं की डोळ्यांसमोर पांढराशुभ्र बर्फ, शांत वातावरण आणि निसर्गाचं सौंदर्य येतं. पण, सध्या एव्हरेस्टची अवस्था पाहिली तर दुःख होईल. जिथे निसर्ग जपायला हवा, तिथे माणसाच्या निष्काळजीपणामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हिडीओ माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प आणि आसपासच्या भागात शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जगातील सगळ्यात उंच पर्वताच्या पायथ्याशी सगळीकडे पसरलेली घाण दिसते. जिथे बर्फ दिसायला हवा, तिथे कचरा दिसतो. जिथे शांतता असायला हवी, तिथे अस्वस्थता जाणवते. निसर्गाच्या सौंदर्याऐवजी माणसाचा निष्काळजीपणा या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतो.
व्हिडीओमध्ये ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, अन्नाचे रिकामे पाकीट, डबे, ऑक्सिजन सिलेंडर, फाटके, तंबू आणि इतर टाकाऊ वस्तू पडलेल्या दिसतात. काही ठिकाणी तर कचरा थेट बर्फात अडकलेला आहे. अनेकजण चढाईसाठी जे साहित्य घेऊन येतात, ते परत नेत नाहीत. वर्षानुवर्षे हा कचरा साचत जातो, बर्फाखाली दडतो आणि हवामान बदललं की पुन्हा वर येतो. स्वर्गासारखी वाटणारी जागा आता कचऱ्याचं मैदान दिसतंय.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी “ही मानवाची लालसा आहे” असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलं, “ज्या निसर्गाची आपण पूजा करतो, त्याच निसर्गाला आपणच संपवत आहोत.” दुसऱ्याने म्हटलं, “एव्हरेस्टवर चढायचा अधिकार मिळण्याआधी जबाबदारी शिकवली पाहिजे.”
तर काहींनी सरकार आणि पर्यटन यंत्रणांवरही प्रश्न केले आहेत. हा व्हिडीओ @EverestToday या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. माउंट एव्हरेस्टवर जी अवस्था दिसतेय ती फक्त एका पर्वताची गोष्ट नाही, तर माणसांची विचार करण्याची पद्धतच दाखवते. आपण वेळीच जागे झालो नाही तर उद्या निसर्गाची अजून कितीतरी सुंदर ठिकाणं अशीच कचऱ्यात हरवलेली दिसतील.
