MS Dhoni Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, काही क्षण असे असतात जे थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्यांच्या एका छोट्याशा चाहत्याची ही खास भेट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे मोठे व्यासपीठ बनले आहे. येथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नृत्य, स्टंट, वाद-विवाद किंवा सेलिब्रिटींचे खास क्षण; प्रत्येक गोष्ट इथे वेगाने पसरते. अशाच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि या व्हिडीओमध्ये दिसत आहेत क्रिकेटविश्वातील महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला चाहता अत्यंत उत्साहाने धोनी यांच्या जवळ जाताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडीशी घाबरट भावना स्पष्ट जाणवते. तो धोनींकडे ऑटोग्राफची विनंती करतो. धोनी नेहमीप्रमाणे शांत आणि साधेपणाने त्या मुलाला ऑटोग्राफ देतात. इतक्यावरच न थांबता ते त्या मुलासोबत फोटोसाठीही पोझ देतात.
मात्र, खरी गंमत त्यानंतर सुरू होते. त्या मुलाचे वडील त्याला आठवण करून देतात की, “तू जे गिफ्ट आणले आहेस ते दे.” मग तो छोटासा चाहता धोनींना त्यांचा एक फोटो भेट म्हणून देतो. हा निरागस आणि भावनिक क्षण पाहून धोनीही थोडेसे हसतात. ते त्या फोटोवर स्वतःचा ऑटोग्राफ करतात आणि पुन्हा तोच फोटो त्या मुलालाच परत देतात.
हा साधा पण मनाला भिडणारा प्रसंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याची माहिती मिळालेली नसली तरी त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @WorshipDhoni या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, त्यावर भरभरून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
एका वापरकर्त्याने लिहिले, “मला हा माणूस खूप आवडतो.” दुसऱ्या व्यक्तीने म्हटले, “कोणी या व्यक्तीला कसा नावडू शकतो?” तिसऱ्या वापरकर्त्याने थोड्या विनोदी शैलीत प्रतिक्रिया देत म्हटले, “या मुलाच्या जागी मला असायला हवे होते!” तर आणखी एका चाहत्याने लिहिले, “माही भाई, ऑटोग्राफ नको, आम्हाला तुम्ही मैदानावर पाहिजे.”
धोनींच्या साधेपणाचा आणि चाहत्यांप्रती असलेल्या प्रेमाचा हा छोटासा नमुना पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे, म्हणूनच कदाचित आजही धोनी हे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
