Mumbai Airport Fight Video Viral : सध्या सोशल मीडियावर मुंबई एअरपोर्टबाहेरील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धडकी भरू शकते; ज्यात एक कॅबचालक एका व्यक्तीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्ट ते विलेपार्लेदरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरील असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी मुंबई एअरपोर्ट पोलिसांनी कॅब चालकावविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलबाहेर आरोपी कॅबचालकाचे एका व्यक्तीबरोबर काही कारणावरून वाद झाला. या वादात चालकाने त्या व्यक्तीला धक्काबुक्की करत कॅबमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यक्तीने चालकाला पकडण्यासाठी थेट कॅबच्या बोनेटवर उडी मारली. पण, अशावेळी चालकाने कॅब थांबवण्याऐवजी बोनेटवर लटकलेल्या व्यक्तीला काही अंतर फरफटत नेले.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हायवेवर एक एर्टिगा कार अनियंत्रित वेगाने धावत आहे आणि या कारच्या बोनेटवर एक व्यक्ती लटकत आहे. जीव धोक्यात घालून ही व्यक्ती फरफटत जात असताना दिसतेय. चालक वेग कमी करण्याऐवजी गाडी जितक्या वेगाने पळवता येईल तितक्या वेगात पळवतोय, जणू काही एखाद्या अ‍ॅक्शन फिल्मधील दृश्य चित्रित केले जात आहे.

यावेळी मागून येणाऱ्या एका बाईकस्वाराने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, कारचा वेग धोकादायकपणे वाढत आहे, तर बोनेटवर लटकलेली व्यक्ती कसे तरी लटकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोपी चालकाला अटक

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. आरोपी चालक भीम कुमार महंतोविरुद्ध विमानतळ रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात बीएनएस कायद्याच्या कलम ३५(३) आणि मोटार वाहन कायदा, कलम 184 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची पोलिसांनी त्याच्यासह त्याची गाडी देखील ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू केली आहे.