Mumbai Auto Driver Monthly income Video : मुंबईत बोलणाऱ्याची मातीपण विकली जाते. त्यामुळे मुंबईत जो कोणी मेहनत करेल, तो कधीच उपाशी झोपू शकत नाही. आज देशभरातून लोक चांगली नोकरी मिळवणे वा व्यवसायात नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी मुंबई गाठतात. मिळेत ते काम करून पैसा कमावतात. अनेक जण स्वकमाईसाठी रिक्षा चालवतात. याच रिक्षाद्वारे कित्येक जण रोज हजारोंची कमाई करतात. सध्या मुंबईतील अशाच एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, ज्यात रिक्षाचालक त्याच्या रोजच्या कमाईविषयी बोलताना दिसतोय. त्याची कमाई ऐकून तुम्हीही चकित व्हाल.
व्हिडीओमध्ये एक माणूस एका ऑटोचालकाशी बोलताना दिसतोय, ज्यामध्ये ड्रायव्हर त्याच्या कमाईबाबत सांगताना दिसतोय. तो माणूस शहरात राहण्यासाठी खूप जास्त खर्च येतो, असे सांगत होता. ज्यावर रिक्षाचालक उत्तर देतो की, मुंबईत राहण्यासाठी खर्च जास्त लागत असला तरी कमाईच्याही भरपूर संधी आहेत. इथे पैसा ओतला जातो; पण तो पकडण्यासाठी कोणीतरी हवे असते.
दररोज किती कमावतो?
व्हिडीओमध्ये रिक्षाचालक सांगतोय की, तो दररोजचा खर्च सोडून सरासरी २,५०० रुपये कमावतो. ते ऐकून समोरचा माणूसही खूप आश्चर्यचकित होतो. तो सांगतो की, बी.टेक.मध्ये पदवीधर झाल्यानंतर मला पहिली नोकरी मिळाली तेव्हाही तो तेवढे कमवू शकला नाही. पटकन कॅलक्युलेशन करत तो म्हणतो की, जर तुम्ही दररोज २,५०० रुपये कमावता, तर दरमहा सुमारे ७५,००० रुपये कमवत असाल. मग तो गमतीने म्हणतो की, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा ऑटो चालवणे चांगले आहे. कारण- इथे त्याला दररोज नवीन लोक तरी भेटतात.
लोकांच्या मजेदार कमेंट्स
या व्हिडीओवर एक मेसेजही लिहिण्यात आला आहे आणि तो म्हणजे, भारतात ३०,००० रुपयांची कमाई देणारी नोकरी आदरणीय मानली जाते; परंतु ७५,००० रुपये कमावणाऱ्या ऑटोचालकाला तितका आदर मिळत नाही. यावरून समाजात यश कसे मोजले जाते याबद्दल सोशल मीडियावर एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनीही त्यावर भरभरून कमेंट्स केल्यात. एकाने विनोदी पद्धतीने लिहिले की, “भावाकडे टीम मेंबर्ससाठी काही जागा रिक्त आहेत का?” दुसऱ्याने लिहिले, “आई… मला ऑटोचालक व्हायचे आहे!” काहींनी तर मोठ्या शहरांमध्ये बरेच ऑटोचालक खरोखर चांगले कमावतात हेदेखील निदर्शनास आणून दिले.
