BEST Bus Video: मुंबईकरांचं स्पिरिट या नावाने अनेकदा गैरसोयीला ग्लॅमरस बनवून सादर केलं जातं. ट्रेनच्या, बसच्या गर्दीत धक्के खात जेव्हा प्रवास करायला लागतो तेव्हा प्रत्येक मुंबईकर आपल्या गैरसोयीसाठी सरकारला दोष देतच असतो. पण काही वेळा सरकारी योजनांचा लाभ घेताना काहीजण स्वतःच शिस्त विसरून जातात. असाच काहीसा प्रकार मुंबईतील कार्टर रोड परिसरात घडल्याचे दिसून येत आहे. मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागे लटकून दोन तरुणांनी प्रवास केल्याचे दिसत आहे. सुरुवातीला हे वाचून व व्हिडीओ बघून कदाचित तुम्हालाही या तरुणांची दया येईल, बिचाऱ्यांना गर्दीमुळे जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतोय असं वाटेल पण जेव्हा आपण या व्हिडिओची खरी बाजू जाणून घ्याल तेव्हा तुमचाही संताप होईल.
X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर बांद्रा बझ या नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये लिहिलेल्या कॅप्शनप्रमाणे, दोन विद्यार्थ्यांनी बांद्रा येथे कार्टर रोड परिसरात स्टंटबाजी करण्याच्या नादात हिरोगिरी करताना बसच्या मागे लटकून प्रवास केला. साधारण तुम्ही सादर बस स्टॉपच्या येथील दृश्य पाहून अंदाज लावू शकता की बसमध्ये चढायला जागा होणार नाही इतकी गर्दी तर निश्चितच दिसत नाही. अन्य प्रवासी अगदी शिस्तीत बसमध्ये चढतात, बस थांबून सुद्धा असते पण तरीही हे दोन विद्यार्थी मुद्दाम बसला लटकून राहतात.
Video: मुंबईकरांचा निष्काळजीपणा
एका युजरने या व्हिडिओवर केलेल्या कमेंट्नुसार सदर गाडी ही वांद्रे आगार, पश्चिमची आहे. या युजरने बेस्ट प्रशासनाला टॅग करत कृपया सदर प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व असे वायफळ स्टंट केल्यास काय कारवाई / शिक्षा होऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण सोशल मीडिया माध्यमातून आम्हा जनतेला दाखवावे अशीही विनंती केली आहे.
हे ही वाचा<< “मला ७ वेळा थ्रो करायला लागला..”,नीरज चोप्राचा ‘गोल्डन’ थ्रो नंतर संताप; म्हणाला, “माझ्यामुळे बाकीच्यांना..”
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेला टॅग करून या बेशिस्त तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. याठिकाणी पोलीस किंवा वाहतूक पोलीस का नव्हते, किंवा बस चालक- वाहक कोणालाच याविषयी माहिती नव्हती का? असाही प्रश्न या व्हिडिओच्या खाली केला जात आहे.