Vikhroli Pink Flowers : जपानमधील साकुरा म्हणजेच चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करतात. पण मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुलाबी फुलांचा हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आता हजारो किलोमीटरचा प्रवास करत जपानला जायची गरज नाही. कारण मुंबईतच असा एक रस्ता आहे, जो सध्या गुलाबी रंगात न्हालेला दिसतो आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबईत गुलाबी रस्ता (Mumbai’s Pink Wonder)

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील घाटकोपर ते विक्रोळी दरम्यानचा रस्ता सध्या गुलाबी फुलांनी बहरलेला दिसतो. विशेषतः गोडरेज परिसराजवळ हा संपूर्ण पट्टा पाहणाऱ्यांना जपानमधील चेरी ब्लॉसमची आठवण करून देतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांवर आणि खाली सांडलेल्या गुलाबी पाकळ्यांमुळे हा परिसर एखाद्या स्वप्ननगरीसारखा भासतो.

ही फुलं नेमकी कोणती? (Which Flowers Are These?)

ही फुलं पारंपरिक जपानी चेरी ब्लॉसम नसून ‘पिंक टॅबेबुइया’ किंवा ‘पिंक ट्रम्पेट ट्री’ म्हणून ओळखली जातात. शास्त्रीय नाव Tabebuia Heterophylla असलेल्या या झाडांना फारसं पाणी लागत नाही आणि ती शहरातील प्रदूषणातही सहज तग धरू शकतात. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरासाठी ही झाडं अतिशय उपयुक्त मानली जातात.

सोशल मीडियावर गुलाबी रस्त्याची चर्चा (Viral On Social Media)

इंस्टाग्रामवर या गुलाबी रस्त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या. “विक्रोळीचं सौंदर्य वेगळंच आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्याने, “मुंबई कधीच थांबत नाही, पण या गुलाबी क्षणांसाठी ती श्वास घ्यायला शिकते,” असं भावूकपणे लिहिलं. मात्र काही नागरिकांनी गर्दी, प्रदूषण आणि फुलांच्या फांद्या तोडल्या जात असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

कसं जायचं? तिकीट आहे का? (How To Reach & Entry Fee)

हा रस्ता सार्वजनिक असल्यामुळे येथे प्रवेशासाठी कोणतंही तिकीट नाही. घाटकोपर किंवा विक्रोळी रेल्वे स्थानकावर उतरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने गेल्यास हा गुलाबी पट्टा सहज पाहता येतो. खासगी वाहन, बस किंवा टॅक्सीनेही येथे पोहोचता येते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत हा नजारा अधिक खुलून दिसतो.