मुंबईतील लोकल प्रवास हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मानल जाते. रोज लाखो प्रवासी वेळ वाचवण्यासाठी आणि कामावर पोहोचण्यासाठी लोकलवर अवलंबून असतात. वाढणारी गर्दी, घाईगडबड व जागेची कमतरता यांमुळे अनेकदा प्रवाशांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण होताना दिसतो. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि त्यातून मुंबईतील वाहतुकीवर निर्माण होणारा ताण पुन्हा एकदा समोर आला आहे.

गर्दीच्या वेळी लोकांची घाई, संयम आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे छोट्या घटनासुद्धा मोठ्या समस्या बनतात. अशाच एका घटनेने सध्या मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.दादर रेल्वेस्थानकावर घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्यामुळे लिफ्ट काही वेळ अचानक अडकली होती. व्हिडीओमध्ये दिसते की, लिफ्ट पूर्ण भरल्यानंतरही काही प्रवासी आत जाण्याचा प्रयत्न करत होते.

काही प्रवाशांनी इतरांना बाहेर येण्याची विनंती केली, जेणेकरून लिफ्ट पुन्हा सुरू होऊ शकेल; पण सगळ्यांनाच घाई असल्याने कोणीही बाहेर यायला तयार नाही. कृपया दोन मिनिटांत लिफ्ट परत सुरू होईल,” असेही सांगितले; पण सुरुवातीला कोणीही बाहेर यायला तयार नव्हते. काही वेळ गोंधळ आणि वाद झाल्यानंतर लिफ्टचे दरवाजे बंद झाले. काही प्रवासी जवळपास १५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकून राहिले.

पाहा व्हिडीओ

ही घटना नेमकी कोणत्या वेळी घडली हे स्पष्ट नाही; पण दादर हे महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे येथे दिवसभर मोठी गर्दी असते.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी प्रवाशांच्या निष्काळजीपणावर टीका केली असून, सुरक्षिततेपेक्षा घाईला प्राधान्य दिले जात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

काहींनी रेल्वे प्रशासनाने अधिक नियंत्रण आणि जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. अलीकडेच बद्लापूर स्थानकावर गर्दीच्या लोकलमध्ये चढताना एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा घटनांकडे जास्त लक्ष देऊन पाहण्याची गरज असल्याचेही नागरिक म्हणत आहेत. गर्दी टाळणे कदाचित शक्य नसले तरी नियम पाळणे आणि थोडा संयम ठेवणे हे प्रत्येक प्रवाशासाठी महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.