Woman Attacked at Dadar Station: मुंबईतील दादर रेल्वेस्थानक परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका महिलेला रेल्वे रुळांजवळ मारहाण होत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ही घटना अनेकांच्या उपस्थितीत घडत असतानाही कोणीही तातडीने हस्तक्षेप करताना दिसत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पुरुष फलाटालगत असलेल्या रेल्वे रुळांवर एका महिलेला वारंवार लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. काळ्या रंगाचे कपडे घातलेली महिला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र, ती पूर्णपणे असहाय असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येते. संबंधित पुरुष तिला रुळांवरून ओढत नेत असल्याचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना स्थानकावर अनेक प्रवासी उपस्थित असल्याचे दिसते. पावसामुळे ओलसर झालेल्या फलाटावर उभे असलेले अनेक जण हा प्रकार पाहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असले तरी हल्लेखोराला रोखून, महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पुढे सरकत असताना हल्लेखोर अधिक आक्रमक होताना दिसतो. तो महिलेचा टी-शर्ट पकडून तिला फलाटाच्या टोकाच्या दिशेने ओढत नेत असल्याचे दिसते. मारहाणीत पडत असताना ती महिला पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत असतानाही तिला पुन्हा मारहाण होत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देत हा विषय शासकीय रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली.

मात्र, ही बातमी लिहेपर्यंत जीआरपीकडून या प्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेल नव्हते. तसेच व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे का, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे का किंवा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, तो कोणत्या कारणामुळे घडला आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या त्या दोघांमधील वादाचे नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या घटनेसंबंधातील तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके सत्य काय ते स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असताना नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता, तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. काहींनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करीत अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

(टीप : ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि उपलब्ध प्राथमिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. व्हिडीओतील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या प्रकरणी संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होईल.)