Bandra beach garbage: दिवाळीच्या रात्री मुंबईतल्या नागरिकांनी फटाके फोडण्याच्या आनंदात शहर प्रकाशाने उजळवले, पण या उत्साहाची दुसरी बाजू मात्र सकाळी समोर आली. दिवाळीच्या रात्रीनंतर मुंबईतील सकाळचे दृश्य अजिबात उत्साही नव्हते. शहरातील रस्त्यांपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत सर्वत्र फटाक्यांचे अवशेष, प्लास्टिकचे कव्हर आणि अन्नपदार्थांचा कचरा पसरलेला दिसून आला. प्रकाशोत्सवाची चमक काही तासांतच मंदावली आणि त्याची जागा अस्वच्छता दृश्यांनी घेतली. दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि स्वच्छतेचा संदेश देणारा सण आहे; परंतु या दृश्यांनी, “आपण आनंद साजरा करीत आहोत; पण कोणत्या किमतीवर,” असा एक गंभीर प्रश्न उपस्थित केला.

वांद्र्यातील कार्टर रोडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक्स ट्विटर वापरकर्ता मनू थियास यांनी हा व्हिडीओ सकाळी साडेसातच्या सुमारास शूट करून पोस्ट केला. व्हिडीओत दिसतंय की, समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला, पायवाटा आणि रस्त्यांवर प्लास्टिकच्या पिशव्या, वापरलेले फटाके, खाद्यपदार्थांचे उरलेले अवशेष विखुरलेले आहेत. सकाळी चालायला जाणारे काही नागरिक या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून वाट काढताना दिसतात.

मनू थियास यांनी सांगितलं, “दिवाळीच्या रात्री आकाशात फटाक्यांचा जल्लोष सुरू असतानाचं दृश्य सुंदर होतं; पण दुसऱ्या दिवशीचं दृश्य दु:खद होतं.” त्यांचा हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

पाहा व्हिडिओ

याचबरोबर मुंबईच्या कोस्टल रोड प्रॉमेनेडवरूनही अशाच प्रकारचे दृश्य समोर आले. समुद्रकिनाऱ्याजवळ जळालेल्या फटाक्यांचे अवशेष, कागदी डबे पडलेल्या दिसल्या. सकाळी धावायला आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पालिकेकडून तातडीने स्वच्छतेची मागणी केली.

या व्हिडीओखाली अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, “एक रात्र आनंदासाठी, आणि दुसऱ्या दिवशी निसर्गाची अशी दुर्दशा — हे पाहून मन दुःख होतं.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “फटाक्यांच्या प्रकाशासोबत पर्यावरणाचं प्रदूषणही वाढलं, हे आपण विसरतो.”यावेळी अनेकांनी जबाबदारीने उत्सव साजरा करण्याचे आणि योग्य कचरा व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.

मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता पथकांनी सकाळपासूनच साफसफाईला सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांनी दाखवलेली बेपर्वाईची वृत्ती सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. दिवाळीचा खरा अर्थ केवळ प्रकाशात नाही, तर स्वच्छता आणि पर्यावरणाचा आदर राखण्यात आहे — याची या व्हिडीओने पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.