Mumbai IT Engineer Layoff: एकीकडे वाढदिवसाच्या शुभेच्छांची वाट पाहत असतानाच थेट कंपनीकडून नोकरीवरून काढल्याचा ई-मेल हातात पडल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका अनुभवी सॉफ्टवेअर अभियंत्याला त्याच्या वाढदिवशीच कंपनीने कामावरून कमी काढले. संबंधित कंपनी भारतातील टेक टीमवरील अवलंबित्व हळूहळू कमी करत असल्याने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटी कंपन्यांकडून सातत्याने होणारी नोकर कपात आणि विशेषतः भारतीय इंजिनिअर्सवर कोसळलेली कुऱ्हाड यावर आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ताज्या घटनेने समाजमाध्यमांवर नवा वाद निर्माण केला आहे.

नेमकी घटना काय?

पाच वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या या अभियंत्याने सोशल मीडिया मंच ‘रेडिट’वर आपली आपबिती मांडली. कंपनीने अचानक कामावरून काढलेल्या आठ कर्मचाऱ्यांमध्ये त्याचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीतील अनेक मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे आपल्या कामावर कंपनीचे मोठे अवलंबित्व असतानाही अशा प्रकारे अचानक काढून टाकल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केले.

आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “वाढदिवशीच मला हा मोठा धक्का बसला. कंपनी आता भारतातील टेक टीमवरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने संपवत असल्याने माझ्याबरोबर इतर सात जणांनाही कामावरून काढून टाकण्यात आले. मी कंपनीच्या अनेक प्रकल्पांची महत्त्वपूर्ण धुरा सांभाळत असल्याने हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होता.”

नोकरी गेल्यानंतर खचून न जाता त्याने पुढील मुलाखतींची तयारी सुरू केली आहे. तो ‘फुल-स्टॅक’ इंजिनिअर असून रिॲक्ट, नोड.जेएस, रिॲक्ट नेटिव्ह, एडब्ल्यूएस, सी-शार्प आणि एसक्यूएल या तंत्रज्ञानांमध्ये कुशल आहे. कंपनीतून काढण्यापूर्वी तो पाईनकोन आणि लाईव्हजेनशी संबंधित एका ‘एआय अवतार’ प्रकल्पावर काम करत होता. याशिवाय, त्याच्या एका वैयक्तिक प्रकल्पातून गेल्या दोन महिन्यांत ४०० डॉलर्सची कमाई झाल्याचेही त्याने नमूद केले.

Got laid off on bday, even with a lot of dependency
byu/mriidicc indevelopersIndia

नेटकऱ्यांकडून पाठिंबा आणि संताप

या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर आयटी क्षेत्रातील अनिश्चिततेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युझर्सनी त्याला दिलासा देत नोकरीसाठी ‘रेफरल्स’ची तयारी दर्शवली, तर काहींनी स्वतःचे असेच कटू अनुभव शेअर केले.

एका युझरने लिहिले, “हे वाचून मला माझीच परिस्थिती आठवली. या महिन्यात माझ्या वाढदिवशीच मला ‘ओरॅकल’मधून काढून टाकण्यात आले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोन येतील अशी अपेक्षा असताना नोकरी गमावल्याचा मेल आला. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असतानाही अशी वेळ आल्याने मला केक कापण्याचीही इच्छा झाली नाही.”

दुसऱ्या एका युझरने, “माझ्या पतीबरोबरही असेच घडले होते, पण नंतर तीच गोष्ट त्यांच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरली,” असा सकारात्मक दिलासा दिला. दरम्यान, अनेकांनी त्याला खचून न जाता काही दिवस विश्रांती घेऊन नव्या जोमाने मुलाखतींची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.

(अस्वीकृती: वरील वृत्त सोशल मीडियावर युझरने पोस्ट केलेल्या माहितीवर आधारित आहे. मूळ पोस्टमध्ये केलेल्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आलेली नाही.)