Mumbai Local Fraud Video : मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांच्या रोजच्या जगण्याचे साधन आहे. यातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ते गर्दीत धक्काबुक्की सहन करत नोकरी-धंद्याचे ठिकाण गाठतात. पण, याच मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांबरोबर फसवणुकीच्या घटना घडत असतात. तुमचीही अशी फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर खालील व्हायरल व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.

कारण मुंबई लोकलच्या प्रवासादरम्यान लोकं तुमच्याबरोबर गोड बोलून कधी तुमच्या खिश्यातील पैसे काढतील सांगता येत नाही, त्यामुळे सावध असणं फार गरजेचे आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ अंधेरी रेल्वेस्थानकावरील आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, अंधेरी रेल्वेस्थानकाच्या तिकीट काउंटरजवळ एक महिला उभी आहे, जी समोरून येणाऱ्या एका तरुणाला तिकिटासाठी पैसे नाहीत असं खोटं सांगून १०-२० रुपये देण्याची मागणी करते, तरुण विश्वास ठेवून तिला पैसे देतो. पण, ती अशाचप्रकारे अनेक लोकांकडून खोटं बोलून पैसे उकळत होती, विशेषत: तरुण-तरुणींना टार्गेट करत ती अडवत होती आणि तिकिटासाठी पैसे नाही असे खोटे सांगत पैसे घेत होती. अशाप्रकारे तिने अनेकांची फसवणूक केली, पण लोकही सहजपणे तिला पैसे काढून देत होते.

अशाप्रकारे फक्त अंधेरीच नाही तर बोरिवली आणि इतर अनेक स्थानकांवर लोक खोटं बोलून भावनिक आव्हान करत प्रवाशांची अक्षरश: लूट करतात. काहीवेळा प्रवाशांना अडवून सांगतात की, माझं पाकीट घरी राहिलं आहे, माझं घर इथून लांब आहे, मला तिकिटासाठी पैशांची मदत कराल का? यावेळी काहीजण मुद्दाम तुमच्याशी चांगल्याप्रकारे इंग्रजीत संवाद साधतात, जेणेकरून तुम्हाला खरं वाटेल की खरंच या व्यक्तीला पैशांची गरज आहे. पण, अशाप्रकारे ते लोक अनेकांची फसवणूक करतात.

प्लॅटफॉर्मवर पैसे मागणाऱ्यांपासून सावधं! पाहा video

मुंबईतील रेल्वेस्थानकावरील हा व्हिडीओ majiddlive नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही आपले अनुभव शेअर करत आहेत. एकाने लिहिले की, सगळ्यांची स्वतःची एक भीक मागण्याची स्टाईल आहे आणि मजबुरीदेखील. दुसऱ्याने लिहिले की, अरे हे अंधेरीलाच काय सगळीकडे होत आहे, हे लोक काम धंदे करत नाहीत, फक्त रेल्वेच्या तिकिटाला, बसला पैसे मागतात. विशेषत: तरुण मुला-मुलींना टार्गेट करतात आणि रोज नवीन रेल्वेस्थानकावर जातात. अशा लोकांमुळे ज्यांना खरंच गरज आहे, अशा लोकांवर पण संशय येतो.