Mumbai Local Train Video Viral : मुंबई लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांची रोजच्या जगण्याचा एक आधार आहे. लाखो लोक रोज मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीत उभं राहून धक्काबुक्की सहन करत कामा-धंद्याचे ठिकाण गाठतात. अनेक लहान मोठ्या फेरीवाल्यांचे पोट या लोकल ट्रेनवर अवलंबून आहे, त्यामुळे काहीही झालं तरी मुंबईकरांना प्रवासासाठी लोकल ट्रेनशिवाय पर्याय नाही. पण, याच लोकलने रोजचा प्रवास करताना मुंबईकरांचं जगणं कसं असतं हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई लोकलच्या महिला डब्यातील हा व्हिडीओ मुंबईकरांच्या जीवघेण्या प्रवासाचा आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना महिलांच्या डब्यात अनेक घटना घडत असतात. काही घटना या सुखद तर काही वेळा त्या फारच त्रासदायक असतात. काहीवेळा तर इतकी टोकाची भांडणं होतात की महिला प्रवासी एकमेकींच्या जीवावर उठतात. यात आता महिला प्रवाशांच्या डब्यातील अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात महिला चक्क एकमेकींना धक्काबुक्की करत ट्रेनमधून बाहेर पडण्याचा तर काही चढण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठाणे रेल्वेस्थानकातील धडकी भरवणारा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, ठाणे रेल्वेस्थानकातील एका प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन येऊन थांबते. यावेळी महिलांच्या डब्यातही तुफान गर्दी दिसतेय. पण, कितीही गर्दी असू दे ट्रेन तर पकडायची असतेच, त्यामुळे ट्रेन स्थानकावर येत नाही तोच महिला धावत्या ट्रेनमध्ये उड्या मारतात. यामुळे अनेकांना उतरताना अडचण येते. या व्हिडीओतही तेच घडलं. डब्बा पूर्णपणे महिलांच्या गर्दीने भरलेला आहे, त्यामुळे चढलेल्या अनेकांना आत जाता येत नाही आणि उतरणाऱ्यांनाही जागा मिळत नाही, त्यामुळे ट्रेन सुटण्याची वेळ झाली तरी उतरता येत नसल्याने महिलांमध्ये वाद सुरू होतो. काही महिला अक्षरश: एकमेकींना ओढून ट्रेनमधून बाहेर काढत आहेत. गर्दी इतकी जास्त आहे की, अनेकींना तर चढण्यासाठी जागाच मिळत नाही, त्यामुळे त्यांना स्थानकावरचं उभं राहून दुसऱ्या ट्रेनची वाट पाहावी लागतेय. पण हे आजचं नाही, मुंबईकरांसाठी रोजचं जगणं आहे; रोज अनेक मुंबईकर याच गर्दीत धक्काबुक्की सहन करत प्रवास करतात.

View this post on Instagram

A post shared by Chal Mumbai ? (@chal_mumbai)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हेच मुंबईकरांचं नेहमीचं जगणं” युजर्सच्या कमेंट्स

दरम्यान, या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एका प्रवाशाने आपल्या मोबाइलवर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो क्षणात व्हायरल झाला. अनेकांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करत आपला अनुभव शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धडकी भरली आहे, तर अनेकांनी हीच आपली मुंबई आहे असे म्हटलेय, तर काहींनी हेच मुंबईकरांचं नेहमीचं जगणं आहे असे म्हटलंय.