Badlapur Local Train Video Viral: प्रत्येक मुंबईकरासाठी लोकल ट्रेनचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मध्यमवर्गीय नोकरदारांना कार्यालय किंवा कामाचे ठिकाण गाठण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम लोकल करत असते. मुंबईत घरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्यानंतर मुंबईतील बहुसंख्य लोक मुंबईबाहेर असलेल्या वसई-विरार, बदलापूर-अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली अशा ठिकाणी स्थलांतरित झाले. मात्र कामासाठी त्यांना रोजच मुंबईत यावं लागतं. तिसऱ्या मुंबईतील या लोकांना लोकलच्या खोळंब्यामुळं व्यावसायिक अडचणींचा सामना करवा लागतो. मात्र आता हा जीवघेणा प्रवास वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम टाकत आहे.
मुंबईतील मराठी माणूस बदलापूर आणि त्याहीपुढं कर्जतपर्यंत स्थलांतरित झाला. इथे राहणाऱ्या तरूणांना प्रवासासाठी लागणाऱ्या वेळामुळं नोकरी नाकारली जात आहे. काही तरूणांना मुली लग्नासाठी नकार देत असल्याची बाब एका संतप्त प्रवाशाने मांडली आहे. आपले बदलापूर या इन्स्टाग्राम हँडलशी बदलापूरमधील काही रेल्वे प्रवाशांनी संवाद साधताना इथल्या प्रवाशांना कोणत्या नरकयातना भोगाव्या लागतात, याची माहिती दिली.
वेस्टर्नच्या मुली लग्नासाठी नकार देतात
बदलापूरहून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सीएसटीएमकडे जाणारी जलद लोकल प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. सकाळी १० वाजण्याच्या आत कार्यालयात पोहोचण्यासाठी बदलापूरकरांना या लोकलचा आधार असतो. मात्र ही लोकल कधीही वेळेवर धावत नसल्यामुळं प्रवाशांचा संताप अनावर होतो. आपले बदलापूर या स्थानिक वाहिनीशी बोलताना प्रवाशी म्हणाले की, या जीवघेण्या प्रवासामुळं आम्हाला नोकरी मिळत नाही. वेस्टर्नच्या मुली लग्नासाठी थेट नकार देतात.
आपले बदलापूर या इन्स्टाग्राम हँडलवर बदलापूरशी निगडित लोकल समस्यांविषयीचे अनेक व्हिडीओ शेअर केलेले आहेत. संतप्त प्रवाशांच्या भावना अनावर झालेल्या या व्हिडीओंमध्ये दिसतात. एका प्रवाशाने बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सकाळची ८.१० ची लोकल पकडून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. “ही लोकल तुम्ही पकडून दाखवली तरच तुम्हाला आमच्या वेदना समजतील”, असे हा प्रवासी सांगतो.
महिला प्रवाशांचे अश्रू अनावर
सकाळी ८ ते ९ या वेळेत अधिक लोकल सोडल्या जाव्यात अशी बदलापूरकरांची मागणी आहे. कर्जतहून येणाऱ्या लोकल आधीच भरून आलेल्या असतात. त्यामुळे बदलापूरहून या वेळेत लोकल असतील तरच मुंबईला वेळेत पोहोचता येईल, अशी प्रवाशांची मागणी आहे.
एका व्हिडीओमध्ये ८.१० च्या लोकलबद्दल सांगताना महिला प्रवाशांना रडू कोसळल्याचे दिसत आहे. आमच्या मुली सकाळी चहा सुद्धा न घेता ही लोकल पकडण्यासाठी धावतात. पण तरी कधीही लोकल वेळेवर धावत नाही. अशावेळी आम्ही काय करायचे? कामावर वेळेवर गेलो नाही तर आम्ही खायचे काय? असा उद्विग्न सवाल या व्हिडीओत महिला उपस्थित करताना दिसतात.

