Ladies Sing Bhajan In Kalyan To CSMT Train Viral Video : मुंबई लोकल ही फक्त ट्रेन नसून, प्रत्येक मुंबईकराचं जगण्याचं वेगवेगळं कारण आहे. ही ट्रेन कोणाचं घर चालवते, कोणाला आराम आणि विचार करण्यासाठी मोकळी जागा देते, तर कधी कोणाच्या कामाचा ताण नकळत हलका करून जाते. इथे कधी अनोळखी व्यक्ती आपल्या वाटतात, तर कधी आपल्यासारखे असे कितीतरी जण कष्ट करतायत याची जाणीव करून देतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दररोज भांडण होणाऱ्या महिलांच्या डब्यात एक सुखद क्षण पाहायला मिळाला आहे.
इन्स्टाग्राम युजर वैभवी @sassy_vibes10 सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी कल्याण ते सीएसएमटी या मुंबई लोकलमधून प्रवास करत होती. ती भरपूर तणावात होती. व्यवस्थित झोप झाली नव्हती, बरीच कामसुद्धा पेंडिंग होती. त्यामुळे ती तिच्या विचारात, गोंधळलेल्या मन:स्थितीत बसली होती. मग तिचं लक्ष ट्रेनमधील महिला मंडळाच्या एका ग्रुपकडे गेलं. याआधी आपण पुरुषांच्या डब्यात भजन गाणाऱ्या मंडळींचा व्हिडीओ अनेकदा पाहिले आहे. पण, महिलांच्या डब्यात पहिल्यांदाच चक्क भांडणाऐवजी भजन गायले जात होते.
चक्क महिलांच्या डब्यात भजन (Viral Video)
हे भजन ऐकताच तिला खूपच सकारात्मकता जाणवली, ताण हलका झाला, चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिने या भजनाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकदा ट्रेनमध्ये चढण्यासाठीची बायकांची शर्यत, मलाच सीट हवी असा हट्ट, अगदी तुझी बॅगच लागतेय म्हणून केलेलं भांडण आज या भजनाच्या स्वरात कुठेतरी हरवून गेल्याचे पाहायला मिळालं आहे. एकदा बघाच मुंबई लोकलमधील खास करून महिलांच्या डब्यातला अनोखा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sassy_vibes10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून भजन गाणाऱ्या ग्रुपमधील एका महिलेने “हो सकाळी भांडण ऐकण्यापेक्षा हे खुप चांगलंच आहे. मी या ग्रुपचा एक भाग आहे. याचा मला आनंद आहे. आम्ही म्हणतो त्यावेळी बऱ्याच जणी सोबत म्हणत असतात. खुप छान वाटत” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर युजर्स “सुंदर”, “मी त्या ट्रेनने प्रवास करायचे, तेव्हा बायका हनुमान चालीसा आणि स्वामी समर्थ भजन म्हणायच्या. ऐकायला खूपच शांत आणि मनाला समाधान देणारं वाटायचं”, “खूप छान” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
