man offering water to a thirsty stray dog viral video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं खरं स्पिरिट पाहायला मिळतं. सकाळी ऑफिसला जाताना ते अगदी ऑफिसवरून घरी परत येताना भांडण, वाद, भजन- गाणी, अनोळखी माणसांची मदत ते अगदी मारामारीपर्यंत सगळं काही लोकलच्या डब्ब्यात पाहायला मिळतं. त्यामुळे या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत. पण, आज अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये धक्काबुक्की करणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीत माणुसकीचे दर्शन घडले आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल…

आज मुंबई लोकलमध्ये एक सुंदर आणि मनाला भिडणारा प्रसंग घडला. अचानक एक कुत्रा ट्रेनमध्ये आला आणि त्याने एक पाण्याची बाटली उचलून ती उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अस्वस्थ चेहऱ्यावरून त्याला भरपूर तहान लागली असे दिसून येत होते. इन्स्टाग्राम युजर त्याला उठून मदत करणार असा विचार करत होता. इतक्यात एका काकांनी लगेच उठून ती बाटली उघडली आणि त्या कुत्र्याला पाणी दिलं नाही तर अगदी लहान मुलांप्रमाणे बाटली तोंडाला लावून पाजलं.

धावपळीच्या शहरात असे क्षण खूप दुर्मिळ असतात (Viral Video)

आजच्या धावपळीच्या जगात लोक माणुसकी कुठेतरी विसरून गेले आहेत. अनेकदा परिस्थिती समजून न घेता समोरच्याचा वाईट प्रसंगी त्याचा फायदा घेतला जातो. कळत-नकळत एखाद्याच नुकसान केलं जात. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल. गोंधळ आणि गर्दीच्या त्या ट्रेनमध्ये हा छोटासा दयाळूपणाचा क्षण ट्रेनमध्ये बसलेल्यांनीही एक टक पहिला. त्यामुळे ही घटना आपल्याला शिकवते की, धावपळीच्या जीवनात मोजक्या का होईना माणसांच्या मनात अजूनही माणुसकी अजूनही जिवंत आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

पण, ही माणुसकी सोडून काही मंडळी पाणी पाजल्यानंतर त्या काकांनी पाण्याची बाटली ट्रेन बाहेर फेकली ही गोष्ट धरून बसले आहेत. त्यामुळे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या इन्स्टाग्राम युजरने “हो माहिती आहे बाटली बाहेर फेकणं चुकीचं आहे. पण, त्याचवेळी, हा व्हिडीओ एका छोट्याशा माणुसकीच्या कृतीबद्दल आहे. एका माणसाने तहानलेल्या कुत्र्याला पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता त्याला मदत केली. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात असे क्षण खूप दुर्मिळ आणि सुंदर असतात” अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tomorrow11.11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.