Retirement Celebration On Mumbai Local Train : ऑफिसला जाताना स्टेशनवर दिसणारी दररोजची माणसं, नेहमीची ट्रेन, ट्रेनमध्ये रोजची ठरलेली बसण्याची जागा, ट्रेनमध्ये वाट पाहणारे रोजचे प्रवासी, ट्रेनमध्ये दिसणारे छोटे व्यापारी, उतरण्याचे-चढण्याचे नेहमीचे स्टेशन; या सगळ्या गोष्टी नोकरीवर जाताना ठरलेल्या असतात. त्यामुळे अनेक वर्षाच्या या प्रवासाला जेव्हा रिटायरमेंटचा पूर्णविराम लागतो. तेव्हा हा फक्त नोकरीचा नाही तर या सुंदर प्रवासाचा शेवटचा दिवस असतो. तर हाच दिवस एका व्यक्तीला कायमचा लक्षात राहावा म्हणून मुंबई लोकलच्या रोजच्या प्रवाशांनी खूप खास व मोठी गोष्ट केली आहे.

आज कितीही मेट्रो आणि मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेत आल्या असल्या, तरी मुंबई लोकलची जागा कधीच कोणी भरून काढू शकणार नाही, याचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या एका ‘काकांचा’ आज नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नकळत मुंबई लोकलमधील त्यांचा प्रवासही शेवटचा ठरणार होता. हा दिवस त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून प्रवाशांनी भरलेल्या धावत्या लोकलमध्येच सहप्रवाशांनी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा केला.

‘नशीबवान आहात काका’ (Viral Video)

नोकरीतील सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच दररोजच्या प्रवासात सोबत असणारी जीवाभावाची माणसंही तुमच्या नोकरीच्या प्रवासात तितकीच महत्त्वाची असतात. म्हणून त्यांच्या बरोबर त्याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या अंगावर शाल पांघरून, हातात पुष्पगुच्छ आणि घड्याळ भेट म्हणून देत प्रवाशांनी त्यांचा सन्मान केला. एवढंच नाही तर मेदूवडा, गुलाबजाम आणि पेढे प्रवाशांमध्ये वाटून त्यांनी हा आनंदाचा क्षण आणखी खास केला. सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची पावती त्या काकांच्या चेहऱ्यावरचं समाधान स्पष्टपणे देत होती. म्हणूनच म्हणतात ना, माणूस कर्तव्यातून निवृत्त होतो; पण लोकांच्या आठवणींतून कधीच नाही.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thevaibhavhande या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात येणार आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘हीच खरी कमाई’, ‘मुंबईकरांना व मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला सलाम’, ‘नशीबवान आहात काका तुम्हाला एवढी जीवा भावाची माणसं भेटली तुमच्या आयुष्यात’, ‘लय माणसं कमवली काकासाहेब…. व्हिडीओ बघून समजलं’, रीटायरमेन्टचा खुप खुप सुभेच्छा पुढील आयुष्य सुखी समाधानचा जावो हि ईश्वर चरणी पार्थना’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.