Mumbai Local Viral Video : एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचायचं असेल तर ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्यापेक्षा पटकन लोकलने प्रवास करणं कधीही सोयीस्कर वाटतं. त्यामुळे मुंबई लोकलचा प्रवास हा मुंबईकरांसाठी सर्वात सुखाचा मानला जातो. इथे प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रवास सुरुच असतो. कोण लॅपटॉपवर पेंडिंग काम करतं असतं, तर कोण घरातील समस्या विसरण्यासाठी खिडकीकडे तोंड करून आश्रू लपवतं असतं तर कोण पोटापाण्यासाठी इतरांकडून पैसेही मागत असतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये पैसे मागणारा नाही तर पहिल्यांदा पैसे कमावणारा ट्रान्सजेंडर दिसला आहे.

रेल्वेने प्रवास करताना तुम्ही अनेकदा गरीब किंवा तृतीयपंथी लोकांना आपल्याकडे पैसे मागताना दिसतात. यावेळी प्रवासी एकतर त्यांना पैसे देतात किंवा थेट नाही सांगून टाळतात. अशावेळी तेही लोक शांतपणे निघून जातात. पण, काही जणांनी यासाठी स्वतःचे काही वेगळे मार्ग निवडले आहेत. कोणाचं कौतुक करून, अगदी गोड-गोड बोलून, तर कोणाला आशीर्वाद देऊन, नृत्य किंवा स्वतःची कला सादर करून, मनोरंजन करून ही मंडळी इतरांकडून पैसे मागतात. जेणेकरून इतरांकडून पैसे मागण्याचे ओझं मनावर राहणार नाही.

आजच्या व्हायरल व्हिडीओत सुद्धा कोणी पैसे देत नाही याचा दोष इतरांना देण्यापेक्षा या ट्रान्सजेंडरने स्वतः पैसे कमावण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला आहे. मुंबई लोकलमध्ये ती पिशवीतून काही वस्तू घेऊन विकायला आली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, यापैकी कोणतीही वस्तू ती फक्त ५ रुपयांना विकत होती. त्यामुळे आपल्याकडून सगळे वस्तू विकत घेत आहेत त्याचा आनंद आणि पोटा-पाण्यासाठी पैसेही हातात येत आहेत याचं समाधान ट्रान्सजेंडरच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

दोष देण्यापेक्षा, आनंदाने स्वीकारलं (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “ती एक ट्रेन मधली ट्रान्सजेंडर महिला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “इज्जत मध्ये जगायचं असेल तर कष्टाला पर्याय नसतो.अभिमानास्पद आहे हे”, “खरं तर ह्यांचं कौतुक केल पाहिजे, हात पसरून जबरदस्ती पैसे मागण्यापेक्षा हे किती तरी सरस आहे”, “हो कोणतीही गोष्ट ५ रुपयाला देतात ट्रेनमध्ये मी ही खुप सामान घेतलं आहे यांच्याकडून”, “खरा माणूस”, “खूप छान स्वाभिमानी आयुष्य जगणे… आणि स्वावलंबी पण…”, “समाजामध्ये समानतेची वागणूक, त्यांच्याहातात कामे दिली सरकारने आणि खाजगी क्षेत्रांनी तर कोणत्याही ट्रान्सजेंटर ट्राफिक सिग्नल वर पैसे मागताना दिसणारं नाही” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.