Mumbai Local Viral Video: मुंबईची लोकल म्हणजे लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी; पण हीच जीवनवाहिनी अनेकांसाठी रोज जीव धोक्यात घालणारा प्रवास ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील गर्दी आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धावणाऱ्या लोकलमधील दिवा-मुंब्रादरम्यानच्या प्रसंगाचा हा व्हिडीओ पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला प्रचंड गर्दीमुळे महिलांच्या डब्याच्या दारात अक्षरशः लटकून प्रवास करताना दिसते. डब्यात उभे राहण्यासाठीही जागा नसल्याने तिला दारावरच उभे राहावे लागते. लोकल वेगाने पुढे जात असताना काही क्षणांतच रेल्वे पुलाचा खांब अगदी जवळून जातो आणि हा क्षण पाहून पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येतो. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही; मात्र हा व्हिडीओ मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासातील भीषण वास्तव समोर आणतो.
ही घटना मध्य रेल्वेच्या दिवा–मुंब्रा मार्गावरील असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा व्हिडीओ चित्रित झाला, त्याच परिसरात यापूर्वी गर्दीच्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जुन्या दुर्घटनांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो महिला दररोज कल्याण, डोंबिवली, दिवा आणि आसपासच्या स्थानकांवरून लोकलने प्रवास करतात. मात्र, गर्दी इतकी प्रचंड असते की, अनेक महिलांना नाइलाजाने दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास करावा लागतो. कार्यालयात वेळेवर पोहोचायचे की, स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, असा प्रश्न अनेक महिलांसमोर दररोज उभा राहत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
डोंबिवली येथील प्रवासी कार्यकर्त्या लता अरघडे यांनी सांगितले की, दररोज हजारो महिला आधीच खचाखच भरलेल्या लोकलमध्ये चढतात. डब्यात जागाच नसल्याने अनेकांना दारावर उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. गर्दीच्या वेळेत हा प्रवास अधिक धोकादायक ठरतो.
प्रवासी संघटनांच्या मते, कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महिलांसाठी राखीव जागा आणि डब्यांची क्षमता त्यानुसार वाढलेली नाही. त्यामुळे महिलांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
प्रवासी कार्यकर्त्या वंदना सोनवणे यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ठाणे परिसरातून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितपणे घरी पोहोचणे आणि अपघाताच्या आकडेवारीत भर पडणे यांमधील अंतर कधी कधी अवघ्या काही इंचांच्या पाय ठेवण्याच्या जागेएवढेच उरते. आणखी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच उपाययोजना होणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये केवळ ठाणे–दिवा रेल्वे मार्गावरून आतापर्यंत १८० प्रवासी रेल्वेतून पडले, त्यापैकी सुमारे ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय, रेल्वेत चढताना किंवा उतरताना किरकोळ जखमी होणाऱ्या अनेक घटनांची अधिकृत नोंदही होत नसल्याचा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील काही १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू केल्याची माहिती दिली आहे. तसेच येत्या काळात आणखी लोकलची क्षमता वाढविण्याचा विचार सुरू असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मुंबई लोकलमधील हा व्हायरल व्हिडीओ केवळ एका महिलेचा प्रवास दाखवत नाही; तर दररोज लाखो मुंबईकर-विशेषतः महिलांना-सहन करावा लागणारा धोकादायक प्रवासही अधोरेखित करतो. गर्दी, अपुरी क्षमता आणि सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा हा VIDEO सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
