Woman Threatened in Local Train: मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हीच लोकल प्रवासापेक्षा भांडण, मारामारी आणि हिंसक घटनांमुळे अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील एका वादात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अद्याप मुंबईकर विसरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरगर्दीच्या लोकलमध्ये एका महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि बेल्टने धमकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या घटनेने पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे… महिला प्रवासी खरोखरच सुरक्षित आहेत का?

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार लोकलच्या पुरुषांच्या डब्यात घडला. संबंधित महिला सीटवर झोपली होती. याच कारणावरून एका पुरुष प्रवाशाने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणांतच हा वाद आक्रमक झाला.

संतापलेल्या त्या व्यक्तीने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने कमरेचा बेल्ट काढला आणि महिलेला त्याच बेल्टने मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार पाहून डब्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.

सगळे पाहत राहिले… पण मदतीला कोणीच धावलं नाही

या घटनेतील सर्वांत अस्वस्थ करणारी बाब म्हणजे, डब्यात अनेक प्रवासी उपस्थित असताना एकाही व्यक्तीने पुढे येऊन महिलेच्या मदतीसाठी प्रयत्न केला नाही.

कोणी त्या व्यक्तीला रोखलं नाही, कोणी महिलेला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला नाही. काही जण शांतपणे हा प्रकार पाहत राहिले, तर काहींनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ चित्रीत केला. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.

व्हिडीओ व्हायरल, पण घटना कुठली?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणत्या रेल्वे मार्गावरील किंवा कोणत्या लोकलमध्ये घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.

महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गेल्या काही महिन्यांत मुंबई लोकलमध्ये घडलेल्या घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. आता पुन्हा एका महिलेला भरलोकलमध्ये धमकावण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

महिलेला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळत असताना कोणीही पुढे न येणे, हीदेखील तितकीच चिंतेची बाब आहे. संकटाच्या वेळी समाजाने केवळ प्रेक्षकाची भूमिका न घेता, कायद्याच्या चौकटीत राहून पीडित व्यक्तीला मदत करण्याची जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिस या घटनेवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.