बिर्याणीचे आपल्यापैकी अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण मुंबई येथील एका व्यक्तीने ५ हजार रुपये किंमतीची हैदराबादी बिर्याणी घरी घेऊन जाण्यासाठी चक्क ४२०० रूपये बॅगेज फी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयावर या व्यक्तीची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
वेल्टन साल्दान्हा यांनी इंस्टाग्रामवर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी हैदराबादमधील त्यांची १२ दिवसांची ‘फूड जर्नी’चे दर्शन घडवले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधील बिर्याणीच्या प्लेट्स, जेवणाचे पॅक केलेले कंटेनर आणि विमानतळावर त्यांनी भरलेल्या एक्स्ट्रा बॅगेज शुल्काची पावती देखील दाखवली आहे.
“बिर्याणी मॅक्स प्रो. हैदराबादमध्ये १२ दिवस. अगणित प्लेट संपल्यानंतर… काही जेवणं इतकी इतकी स्वादिष्ट होती की त्यांना तिथेच सोडून येणं शक्य नव्हतं. कारण बेस्ट बिर्याणी म्हणजे फक्त अन्न नसतं, ती तुमच्याबरोबर घरापर्यंत येते” असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
त्यांनी केलेल्या एका पोस्टच्या एका स्लाइडमध्ये, साल्दान्हा यांनी त्यांच्या या जेवणासाठी किती खर्च आला याबद्दल माहिती दिली आहे.
“५००० रुपयांची बिर्याणी. ती घरी नेण्यासाठी ४२०० रुपये. हैदराबाद… माझा काहीतरी ‘प्रॉब्लेम’ आहे,” असं त्याने या स्लाइडवर लिहिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये एअरलाइनची ४२०० रुपयांची पावती दिसत आहे, जी अतिरिक्त समानासाठी भरलेले शु्ल्क आहे.
एका फोटोमध्ये अनेक पॅक केलेले फूड कंटेनर्स दिसून येत आहेत. ज्यावर लिहिलं होतं की, “हैदराबादमध्ये १२ दिवस राहिल्यानंतर, मी तेच केलं जे प्रत्येक शहाण्या व्यक्तीने केलं असतं… मी माझ्या लगेजमध्ये बिर्याणी पॅक केली.”
या पोस्टमध्ये साल्दान्हा यांनी हैदराबाद भेटीदरम्यान त्यांना सर्वाधिक आवडलेल्या बिर्याणींचा देखील उल्लेख केला आहे. यामध्ये कृष्णाज किचनची नल्ली गोश्त बिर्याणी, Voila F9 Gourmetची सुफियानी बिर्याणी आणि जंगरी बिर्याणी, तसेच साव्या येथील सफेद बिर्याणी यांचा समावेश आहे.
या पोस्टवर खवय्यांनी भरभरून प्रतिक्रियां दिल्या आहेत , ज्यापैकी अनेकांनी बिर्याणीबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमाचे भरभरून कौतुक केले आहे. तर काही जणांनी अन्न बरोबर घेऊन प्रवास करण्याचे त्यांचे अनुभव देखील शेअर केले आहेत.
