Mumbai Rain 1bhk Flat Leakage Viral Video : मुंबईत राहणारा एक तरुण तब्बल १० वर्षांनंतर अखेर १RK वरून १BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. मात्र, शिफ्ट झाल्यानंतर त्याला आलेला अनुभव पाहून नेटीझन्स सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेत आहेत. गजेंद्र पुरी गोस्वामी असे या तरुणाचे नाव असून त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या नवीन भाड्याच्या १BHK अपार्टमेंटचे इंटीरियर दाखवले आहे. यात पावसामुळे झालेली त्याच्या घरातील परिस्थिती दाखवतोय.

घराची सफर दाखवण्यापासून सुरू झालेला हा व्हिडिओ पाहता पाहता मुंबईतील घरांच्या समस्येवर आणि भाड्याच्या घरांतील दुरावस्थेवर भाष्य करत आहे. यावेळी तो घरातील बेडरूमच्या छतामधून गळणारे पाणी दाखवतो.

बेडरूममध्ये दिसला ‘धबधबा’

व्हिडिओमध्ये तरुण सुरुवातीला फ्लॅटच्या हॉलमध्ये जातो, जिथे बसण्यासाठी सोफे, खिडकीबाहेरील दृश्य आणि टीव्ही दिसत आहे. त्यानंतर तो बेडरूमकडे वळतो, जिथे छतातून पाणी टपकताना दिसत आहे. हे टपकणारे पाणी बेडवर गळत असल्याने त्याने ते गोळा करण्यासाठी खाली एक बादली ठेवली आहे. व्हिडिओ शेअर करताना गोस्वामी यांनी मजेशीरपणे आपल्या बेडरूममधील या गळतीला “धबधबा” म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “अखेर (भाड्यात) वाढ झाली.”

‘जुहू चौपाटीला जाण्याची गरज नाही’

व्हिडिओमध्ये गोस्वामी सांगतोय की, “मित्रांनो, मी गेल्या १० वर्षांपासून मुंबईत राहत आहे आणि या सर्व वर्षांत मी १RK मध्ये राहिलो. अखेर, आयुष्यात पहिल्यांदाच मी १BHK मध्ये शिफ्ट होऊ शकलो. आणि बघा, माझा १BHK किती सुंदर आहे. हा एक चांगला हॉल आहे, खिडकीतून छान व्ह्यू दिसतोय, टीव्ही आहे आणि सर्वकाही उत्तम आहे. आता बेडरूमकडे जाऊया. बेडरूमच्या आतला हा सुंदर नजरा पाहा. माझ्या बेडरूममध्ये चक्क एक धबधबा आहे. सांगा, घरात अशी सोय कोणाला मिळते? जुहू चौपाटी किंवा गोरेगाव चौपाटीला जाण्याची गरजच नाही, तुम्ही इथेच येऊ शकता. माझे घर तर पर्यटन स्थळ बनले आहे. आता मी बेडरूममध्ये झोपू शकत नाही, त्यामुळे शेवटी हॉलमध्येच झोपत आहे. म्हणजेच, मी १BHK चे भाडे देत आहे, पण प्रत्यक्षात मी अजूनही १RK मध्येच राहत आहे.”

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @gajendrapurii या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर नेटीझन्सकडून विविध प्रतिक्रिया येत असून अनेक युजर्सनी मुंबईतील या समस्येशी स्वतःला जोडून पाहिले आहे. एका युझरने लिहिले की, “इतकी मेहनत केल्यानंतरही तुम्ही स्वतःला तिथेच पाहता जिथून सुरुवात केली होती.” दुसऱ्याने विचारले, “हा टेरेस फ्लॅट आहे का?” ज्यावर गोस्वामी यांनी “नाही” असे उत्तर दिले. तिसऱ्या युझरने म्हटले, “मी या समस्येशी स्वतःला जोडू शकतो, कारण मी सुद्धा सध्या याच समस्येचा सामना करत आहे.” तर एका युझरने लिहिले की, “मला समजत नाहीये की यावर हसू की दुःख व्यक्त करू.”