Viral Video: अपघात कुठे कधी कसा होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. कुणाची चूक कुणाच्या जीवावर उठू शकते, हे देखील अपघातबाबत सांगणं, बोलणं कठीणच. अचानक कोणती गाडी कुठून येईल? कुणाला धडक देईल? कुणाचा जीव घेईल? याचा काहीही नेमक नाही. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कार चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना कारच्या खिडकीला लटकलेला दिसत आहे.मद्यपान करून वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. रस्त्यांवर सर्वत्र यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. पण तरीही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. भारताच्या बहुतांश रस्त्यांवर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात; तर काही स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असंच या तरुणानं केलंय, अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरच हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नशेत तरुणाने कारच्या खिडकीला लटकून चालवली गाडी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण दारूच्या नशेत असल्याचे दिसून येत आहे. तो कारच्या खिडकीला लटकून जीवाची पर्वा न करता गाडी चालवत आहे. कार चालक चक्क कारच्या दरवाजाबाहेरुन स्टेअरिंग हाती घेत कार चालवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. कार चालकाच्या या कृतीमुळे त्याचा जीव तर धोक्यात आलाच पण रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वांसाठीही हा मोठा धोका होता. अखेर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुसऱ्या वाहनाला धडकली. ही संपूर्ण घटना रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: तुम्हीही ग्लास शेगडी वापरता का? मग किचनमध्ये ही चूक करू नका; पनीर बनवताना झाला स्फोट, पुढे काय घडलं पाहा

मद्यधुंद कार चालकाला अटक

व्हायरल झालेला व्हिडिओ मंगळवारी रात्री १२.१५ वाजता मुंबईतील अंधेरी येथील घाटकोपर लिंक रोडवर शूट करण्यात आला. सूरज साव असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत सूरजने गाडीला धडक दिली. या व्हिडिओची दखल घेत मुंबई पोलिसांनी सूरजविरोधात एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुंबई न्यूज नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.