दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस हा सण साजरा करण्यात येतो. ख्रिस्ती बांधवांचा हा मोठा सण असला तरीही प्रत्येक जण हा सण अगदी उत्साहाने साजरा करतो. ख्रिसमसदरम्यान एकमेकांना भेटवस्तू देणे, खास पोशाख घालणे तसेच विविध कार्यक्रम यादरम्यान खेळण्यात येतात. तसेच सांताक्लॉजकडे खास भेटवस्तूसुद्धा मागितल्या जातात. तर सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना नाताळाच्या शुभेच्छा देत दोन खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

दिवसेंदिवस ऑनलाइन घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीत वाढ होत आहे. देशभरातील असंख्य नागरिक स्कॅमरच्या योजनांना बळी पडत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीदरम्यान नागरिकांना लाखो किंवा अगदी कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर हे लक्षात ठेवून मुंबई पोलिसांनी एक फोटो पोस्ट केला आहे. एक व्यक्ती हातात भेटवस्तू घेऊन उभी आहे, त्याला लाल रंगाने पॅक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांची पोस्ट तुम्हीसुद्धा एकदा बघा.

हेही वाचा…“सर्व धर्म सम भव”, सांताक्लॉजच्या वेशात चिमुकल्यांची सायकल सवारी, आनंद महिंद्रांनी PHOTO केला शेअर, युजर्स म्हणाले…

पोस्ट नक्की बघा :

भेटवस्तूवर एक चिट्ठी लावली आहे आणि त्यावर ‘पासवर्ड’ असे लिहिले आहे. तसेच वर संदेश लिहिण्यात आला आहे की, “या ख्रिसमसमध्ये तुमच्या भेटवस्तू आणि पासवर्ड गुप्त ठेवा.” तसेच ही पोस्ट शेअर करून मुंबई पोलिसांनी, “तुमचे बँक खाते घोटाळेबाजांच्या विश-लिस्टमध्ये येऊ देऊ नका; यावर्षी नाताळबाबाला भेट म्हणून सुरक्षा मागूया”, अशी खास कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

तसेच दुसऱ्या फोटोत सांता दुचाकीवर बसून येतो आहे असा फोटो पोस्ट करून, “हो हो हो…स्वसुरक्षा हीच खरी अनमोल भेट! आपल्या सगळ्यांचा लाडका सांता नियमांचे पालन करूनच भेटवस्तू आणत आहे” ; अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या अनोख्या पोस्ट मुंबई पोलिस यांच्या अधिकृत @mumbaipolice इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिस नेहमीच प्रत्येक सणानिमित्त खास पोस्ट शेअर करत असतात आणि नागरिकांना त्यांच्या सुरक्षेची जाणीव करून देत असतात. आजसुद्धा त्यांनी ख्रिसमसनिमित्त शुभेच्छा देत नागरिकांना त्यांच्याबरोबर होणाऱ्या स्कॅमपासून जागृत राहण्याचा आणि वाहतुकीचा संदेश दिला आहे.