Mumbai Pune Expressway Video: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता. अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. द्रुतगती महामार्गासह जुना पुणे-मुंबई मार्ग बंद असल्यामुळे २५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या १७ तासापासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात प्रवाशांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई-पुणे महामार्ग वाहतूक कोंडी व्हिडीओ (Mumbai Pune Expressway Video)

सोशल मीडियावर @Anuana10 या एक्स अकाउंटवरून एका प्रवाशाने वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला. यात मोठ मोठे ट्रक, टेम्पो तसेच कार यांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. दूर दूरपर्यंत फक्त कोंडी असल्याने परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं दिसून येतंय. “मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल १ तासापेक्षा जास्त वेळ प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. टोल मात्र व्यवस्थित वसूल केला जातो, पण प्रवाशांना चांगले आणि सुरळीत रस्ते कधी मिळणार? आपण ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची भाषा करतो, पण तशी दर्जेदार पायाभूत सुविधा खरंच उभारत आहोत का? जबाबदारी महत्त्वाची आहे. याची दखल कोण घेत आहे?” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

अशाच प्रकारे अनेकांनी फोटो, व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. दोन मुलांच्या आईने आपली व्यथा @AmreenAdv या एक्स अकाउेटवर पोस्ट करत शेअर केली आहे. “CNG ट्रकच्या अपघातामुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर अडकलो आहोत. मी दोन मुलांसोबत प्रवास करणारी महिला आहे. ना पाणी आहे, ना शौचालयाची सोय, ना कुठलीही मदत. ट्रॅफिक अजिबात हलत नाहीये. हा निष्काळजीपणा आणि अमाणुष हाताळणी पाहून धक्का बसला आहे. महामार्ग प्रशासन आणि जबाबदार अधिकारी कुठे आहेत?” असा सवाल थेट प्रशासनाला केला आहे.

मुंबई पुणे महामार्ग

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असून पोलिसांनी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

पर्यायी मार्ग:

१) चांदणी चौक-ताम्हिणी घाट-रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगुट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट-वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दुरशेत-उंबारेनंतर पुढे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग)

२) आळे फाटा-माळशेज घाट-ठाणे मार्गे मुंबई